भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. अमेरिकेतील अॅरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे अपाची हेलिकॉप्टर सुपूर्द करण्यात आले. भारताने अमेरिकेबरोबर २२ अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार केला आहे.

अॅरीझोनामध्ये अपाची हेलिकॉप्टरचे उत्पादन केंद्र आहे. अपाची हेलिकॉप्टरची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. या हेलिकॉप्टरमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. हवाई दलाच्या पठाणकोट तसेच आसामच्या जोरहाटमध्ये या हेलिकॉप्टर्सचा तळ असेल.

भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर २०१५ मध्ये १३,९५२ कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. भारताला मार्च २०२० पर्यंत २२ अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली बॅच जुलैमध्ये भारतीय हवाई दलाला मिळेल. अलबामामधील अमेरिकन लष्कराच्या तळावर सध्या वैमानिक आणि अन्य क्रू  मेंबर्सचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरु आहे.

२२ पैकी अकरा अपाची अत्याधुनिक एएनय/एपीजी-७८ लाँगबो फायर कंट्रोल रडार सिस्टिमने सुसज्ज असतील. ठराविक अंतरावरुन लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची तसेच शत्रूच्या प्रदेशात जमिनीवरुन धोका असतानाही लढण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. अपाची दीर्घकाळापासून सेवेत असलेल्या एमआय-३५ ची जागा घेतील. अपाची क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेले हेलिकॉप्टर आहे.

पाकिस्तानी लष्कराकडे अमेरिकन बनावटीचे एएच-१ कोब्रा हेलिकॉप्टर आहे. त्यांना टर्कीकडून तीस टी-१२९ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. ही दोन्ही लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. चीनकडे झेड-१० लढाऊ हेलिकॉप्टर्स आहेत. दोन महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्सचा समावेश झाला. हे हेलिकॉप्टर हॉवित्झर तोफा वाहून नेण्यास सक्षम आहे.