भारतीय वायु सेनेने रशियाकडून १५०० कोटी रूपयांच्या ‘आर -२७’ या  क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या क्षेपणास्त्रांचे वजन २५३ किलो आहे. तर २५ किलोमीटर उंचीवरून ६० किलोमीटर लांब पर्यंत मारा करण्याची या  क्षेपणास्त्राची क्षमता आहे.

भारत आणि रशिया या दोन राष्ट्रात मागिल काही दिवसातच झालेला हा दुसरा मोठा व्यवहार आहे. या अगोदर भारताने रशियाकडून २०० कोटींच्या रणगाडा विरोधी  क्षेपणास्त्रांच्या खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे. ही क्षेपणास्त्रे एसयू -३० एमकेआय लढाऊ विमानांवर बसविण्यात येणार आहेत.

रशियाने ही  क्षेपणास्त्रे मिग आणि सुखोई मालिकेतील लढाऊ विमानांना जोडण्यासाठी तयार केली आहेत. यांच्या खरेदीमुळे आता भारताची मध्यम आणि लांब पल्ल्यापर्यंत क्षेपणास्त्राद्वारे मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक शस्त्र खरेदीस मंजूरी देण्यात आल्याच्या ५० दिवसांच्या आतच भारतीय वायुसेनेने आतापर्यंत शस्त्र सामुग्रीवर तब्बल ७ हजार ६०० कोटी रूपयांपर्यंतचा व्यवहार केला आहे.