अमेरिका-इराण तणावामुळे भारताला फक्त तेल व्यापारातच नव्हे तर हवाई वाहतुकीतही फटका सहन करावा लागत आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला इराणकडून तेल आयात बंद करावी लागली आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याच्या शक्यतेमुळे भारतीय विमान कंपन्यांनी इराणच्या हवाई हद्दीचा वापर बंद केला आहे. पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असल्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना दररोज ३७ लाख रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

कालच पाकिस्तानने भारताच्या नागरी विमानांसाठी आपली हवाई हद्द खुली केली. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. यामुळे भारतीय कंपन्यांना कोटयावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत होते. मागच्या महिन्यात इराणने अमेरिकेचे टेहळणी ड्रोन विमान पाडले.

त्यानंतर अमेरिकेने हल्ल्याची धमकी दिली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याचा आदेश देऊन नंतर काही मिनिटात माघार घेतली होती. अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेनंतर भारतासह अन्य देशांनी इराणच्या हवाई हद्दीतून विमान वाहतूक बंद केली.