अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या प्रकल्पास भारताचे राजदूत तरणजित सिंग संधू यांनी भेट दिली. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीशी नोव्हाव्हॅक्स करोना लस उत्पादनाचा करार झालेला असून भारत व अमेरिका यांच्यातील वैद्यकीय सहकार्य त्यातून पुढे जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

मेरीलँड येथील गिथर्सबर्ग येथे नोव्हाव्हॅक्स जैवतंत्रज्ञान कंपनीचा प्रकल्प असून संशोधन, विकास, लशीचा वापर यावर कंपनी भर  देणार आहे. भारताचे राजदूत संधू यांनी नोव्हाव्हॅक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टॅनले सी. एर्क यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, की ‘‘नोव्हाव्हॅक्सबरोबर भारताच्या सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मितीसाठी करार केला आहे, त्यातून दोन्ही देशातील आरोग्य सहकार्याला पाठबळ मिळणार आहे.’’  एर्क यांनी राजदूत संधू यांना नोव्हाव्हॅक्स लस चाचण्यात परिणामकारक ठरल्याची माहिती दिली.

जानेवारी २०२० मध्ये नोव्हाव्हॅक्स कंपनीने करोनावर लस तयार करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतरच्या काळात नोव्हाव्हॅक्स व पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यात करार झाला होता.  १४ जून रोजी नोव्होव्हॅक्सने त्यांच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची परिणामकारकता ९०.४ टक्के असल्याचे जाहीर केले होते. या चाचण्या अमेरिका व मेक्सिकोत करण्यात आल्या आहेत. अमेरिकेतील अनेक औषध कंपन्यांना संधू यांनी भेट दिली असून जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, अ‍ॅडव्हामेड, थर्मोफिशर, एली लिली, फायझर,पॉल को ऑपरेशन, अँटिलिया , सायटिवा, जेनेनटेक, लिगँड, ऑक्युजेन, ज्युबिलंट फार्मा या कंपन्यांना त्यांनी भेटी दिल्या. नोव्हाव्हॅक्स ही कंपनी १९८७ मध्ये स्थापन  झालेली असून नॅनोकणांच्या मदतीने लस बनवण्याचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. परिचयाच्या व अपरिचित विषाणूंचा मुकाबला ही लस चांगल्या प्रकारे करू शकते.