मागच्या आठवडयात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. अमेरिकेतील जनतेने सत्तांतराचा कौल देत, जो बायडेन यांच्याहाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. लवकरच जो बायडेन आणि कमला हॅरिस आपले मंत्रिमंडळ जाहीर करतील. बायडेन-हॅरिस प्रशासनात दोन भारतीय वशांच्या नागरिकांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकन प्रसारमाध्यमांनुसार, अमेरिकेचे माजी सर्जन जनरल विवेक मुर्ती यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. सध्या ते करोनाचा प्रसार रोखण्यासंदर्भात भावी अध्यक्ष जो बायडेन यांचे प्रमुख सल्लागार आहेत. त्यांची आरोग्य मंत्री पदावर नियुक्ती केली जाऊ शकते तसेच स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक अरुण मजुमदार यांची ऊर्जा मंत्रीपदावर वर्णी लागू शकते.

आणखी वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला जो बायडेन यांना फोन, अभिनंदन करत म्हणाले…

द वॉशिंग्टन पोस्ट आणि पॉलिटिकोने हे वृत्त दिले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात मॅकेनिकल इंजिनिअरींगचे प्राध्यापक असणारे अरुण मजुमदार हे ऊर्जा संबंधित विषयांमध्ये बायडेन यांचे प्रमुख सल्लागार आहेत. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ असणारे मुर्ती हे प्रचारादरम्यान बायडेन यांना करोनाच्या सद्य स्थिती संदर्भात सतत माहित देत होते.