पाकिस्तानने काल पुन्हा एकदा नापाक हरकत केली. शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन LOC वरील भारतीय चौक्या आणि नागरिवस्त्यांना लक्ष्य केले. गुरेझ ते उरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचा शुक्रवारी पुन्हा भंग केला. या हल्ल्यात एका कॅप्टनसह लष्कराचे चार जवान आणि सीमा सुरक्षा दलाचा एक अधिकारी शहीद झाला, तर सहा नागरिकांचा मृत्यू झाला.

पाकिस्तानच्या या कृत्यानंतर भारताने सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले. भारताने थेट क्षेपणास्त्र डागून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे लाँच पॅडस, बंकर्स उद्धवस्त केले. भारतीय लष्कराने या कारवाईचे अनेक व्हिडीओ सुद्धा जारी केले आहेत. भारतीय लष्कराने उरी, नागाव, तंगधर, केरन आणि गुरेझ सेक्टरमध्ये पसरलेल्या पाकिस्तानी बंकर्सना लक्ष्य केले.

पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने थेट रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा वापर केला. दहशतवाद्यांचे लाँच पॅडससह पाकिस्तानी सैन्याचे दारुगोळयाचे भांडार आणि इंधन टाक्यांना थेट लक्ष्य करण्यात आले. यात पाकिस्तानच्या बाजूला मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे सात ते आठ सैनिक ठार झाले. यात एसएसजी कमांडोंचाही समावेश आहे. एका व्हिडीओमध्ये रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र बंकरच्या दिशेने येत असलेले पाहून पाकिस्तानी सैनिक जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहे. या क्षेपणास्त्राने बंकरचा अचूक वेध घेतला.