भारतीय लष्कराच्या कारवाईत पाच पाकिस्तानी सैनिक ठार झाले. यातून भारतीय सैन्य सीमेपलीकडून कुठलीही आगळीक झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येते असे लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी गुरुवारी सांगितले. भारतीय लष्कर हे नेहमीच पाकिस्तानपेक्षा एक पाऊल पुढे आहे आणि वेळोवेळी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाते असे लेफ्टनंट जनरल सिंग म्हणाले.

वायरलेस आणि जे अन्य संदेश पकडले आहेत त्यावरुन भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट होते असे जनरल रणबीर सिंग म्हणाले. मागच्यावर्षी सीमेवर पाकिस्तानने १,६०० पेक्षा जास्तवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

मंगळवारीच कथुआ जिल्ह्यात हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफचे सहाय्यक कमांडर पाकिस्तानी स्नायपरच्या गोळीबारात शहीद झाले. त्याआधी ११ जानेवारीला राजौरी जिल्ह्यात नौशेरा सेक्टरमध्ये आईडीच्या स्फोटात भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये एका मेजरचा समावेश होता.

पूँछ जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग म्हणाले की, पाकिस्तानने आईडीचा वापर करणे ही नवीन बाब नाही. घुसखोरीसाठी वेळोवेळी त्यांनी आईडीचा वापर केला आहे. पण आम्ही सुद्धा असे प्रकार हाताळण्यासाठी सुसज्ज असल्यामुळे जिवीतहानीचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले.