पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवर परिसरात पुन्हा घुसखोरी करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा चिनी लष्कराचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, अशी माहिती लष्कराने सोमवारी दिली. मात्र चिनी लष्कराने केलेल्या या प्रयत्नामध्ये भारतीय लष्कराला येथील महत्वाच्या भूप्रदेशावर ताबा मिळवण्यात यश आलं आहे. सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार भारतीय लष्कराच्या विशेष दलाने या भागावर चिनी लष्कराला धोबीपछाड देत ताबा मिळवला. उंचीवर असणारा हा प्रदेश युद्धाच्या दृष्टीने अंत्यंत महत्वाचा मानला जात असून या प्रदेशाचा ताबा असणाऱ्याला शत्रूवर सहज नजर ठेवता येणार आहे. २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या संघर्षानंतर भारताने हा प्रदेश ताब्यात घेतला. या ठिकाणाहून अवघ्या काही शे मिटर अंतरावर चिनी लष्कर असून त्यांच्यावर नजर ठेवणे अधिक सोपे झाले असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे, असं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

“भारतीय लष्करातील विशेष दलाने पँगाँग सरोवराच्या दक्षिण काठावरील अगदी दक्षिणेकडे असणाऱ्या थांकउंग येथील उंचीवरील प्रदेशावर ताबा मिळवला आहे. हा उंचीवरील प्रदेश आतापर्यंत निष्क्रीय होता. मात्र चिनी सैनिकांनी केलेल्या खुरापतींमुळे भारतीय लष्कराने या प्रदेशावर ताबा मिळवला असून हा लष्करी तळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण प्रदेश आहे. या प्रदेशावर नियंत्रण असणाऱ्या बाजूला तलावाच्या दक्षिण काठावर आणि आजूबाजूच्या परिसरावर पकड घट्ट करण्यास मदत होणार आहे,” असं सुत्रांचं म्हणणं आहे. हा प्रदेश खरं तर भारताच्या हद्दीत असणाऱ्या भागात आहे, मात्र यावर चिनी लष्कर दावा करत आलं आहे. भारतीय सैन्याने हा प्रदेश ताब्यात घेत मोठी कामगिरी केल्याचे सांगितले जात आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोअर कमांडर पातळीवर चूशूल/मोल्डो येथे चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या असून त्यामधून फारसे काही हाती लागलेलं नाही.  भारतीय सैन्याने दोन्ही देशांमधील “बहु-स्तरीय चर्चेत” झालेल्या सहमतीचे उल्लंघन केल्याचा आरोप चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थेअटर कमांडरने केला आहे. “भारत आणि चीनदरम्यान बहु-स्तरीय चर्चेत झालेल्या सहमतीचे उल्लंघन करुन प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी करत चिथावणीखोर लष्करी कारवाया केल्या,” असं चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थेअटर कमांडरने म्हटल्याचं चीनमधील ग्लोबल टाइम्सने नमूद केलं आहे.

लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी, पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठावर २९ ते ३० ऑगस्ट दरम्यान रात्री चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने चिथावणीखोर लष्करी कारवाया करून ‘जैसे थे’ परिस्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी मोडून काढला, असं सांगितल्यानंतर चीनकडून उलट दावा करण्यात आला. लष्करी आणि राजनैतिक पातळीवर दोन्ही देशांमध्ये झालेल्या मतैक्याचे उल्लंघन चिनी लष्कराने केले. त्यामागे ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा हेतू होता, असेही आनंद यांनी नमूद केलं आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिक पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण काठाकडे कूच करीत होते. त्यांचा हेतू लक्षात येताच भारतीय लष्कराने त्या भागात जवानांच्या तुकडय़ा तैनात केल्या. त्या भागात काही काळ तणाव निर्माण झाला, परंतु दोन्ही देशांच्या लष्करात कोणतीही झटापट झाली नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, भारतीय लष्कर शांततेसाठी वचनबद्ध आहे, भारताच्या प्रादेशिक एकात्मतेचा भंग होऊ देणार नाही, असे लष्कराचे प्रवक्त आनंद यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी १५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हिंसाचारात २० भारतीय जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर चीनने पुन्हा आगळीक केली आहे.  भारत-चीन यांच्यात लष्करी आणि राजनैतिक पातळीवर अनेकदा चर्चा झाली, परंतु पेचप्रसंगाची कोंडी फुटू शकली नाही. दोन्ही देशांनी ६ जुलैला सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू केली, त्याआधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात चर्चा झाली होती. ६ जुलैला सुरू झालेली शांतता चर्चा फार पुढे गेली नाही.

गलवान खोऱ्यातून पीपल्स लिबरेशन आर्मीने माघार घेतली, इतरही काही ठिकाणी त्यांनी सैन्य माघारी घेतले; पण पँगॉग त्सो आणि देपसांगसह आणखी दोन ठिकाणाहून चिनी सैन्याने माघार घेतलेली नाही. कोअर कमांडर पातळीवर चर्चेच्या पाच फेऱ्या होऊनही सैन्य माघारीबाबत फारशी प्रगती झालेली नाही. पूर्व लडाखमध्ये पूर्वी होती तशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे.

५ मे रोजी दोन्ही देशांच्या लष्करात पँगाँग त्सो सरोवर भागात हिंसक चकमकी झाल्या. त्यानंतर ९ मे रोजी उत्तर सिक्कीममध्ये हिंसक चकमक झाली. भारत व चीन यांच्यातील सीमा रेषा ३४८८ कि.मी लांबीची असून चकमकीपूर्वी दोन्ही देशांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढण्याच्या आवश्यकते भर दिला होता. लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आधीच लष्कराच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कमांडर्सना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.