18 July 2019

News Flash

एअर स्ट्राइक झाला त्याचवेळी भारतीय लष्कराचे म्यानमार सीमेवर मोठे ‘ऑपरेशन’

एअर स्ट्राइकवर जगाचे आणि माध्यमांचे लक्ष असताना भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करासोबत मिळून गुप्तपणे भारत-म्यानमार सीमेवर कारवाई केली.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालकोटमध्ये एअर स्ट्राइक केला त्याचवेळी भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर एक मोठे ऑपरेशन केले. बालकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकवर जगाचे आणि माध्यमांचे लक्ष असताना भारतीय लष्कराने म्यानमारच्या लष्करासोबत मिळून गुप्तपणे भारत-म्यानमार सीमेवर ही कारवाई केली. म्यानमारमधील दहशतवादी गटांकडून इशान्य भारतातील महत्वाच्या प्रकल्पांना धोका असल्यामुळे १७ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान हे ऑपरेशन करण्यात आले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

दोन महिने आधीच या मोहिमेची रणनिती आखण्यात आली होती. म्यानमारमधील आराकान आर्मीकडून इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना धोका होता. आराकान आर्मीला संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करांनी गुप्तपणे ही मोहिम पार पाडली. आराकान आर्मी काचीन इंडिपेंडन्स आर्मीशी संबंधित आहे. म्यानमारमध्ये आराकान आर्मीवर बंदी आहे. आराकान आर्मीकडून कालादान प्रकल्पाला धोका होता. त्यामुळे हे ऑपरेशन करण्यात आले.

कालादान प्रकल्पामुळे कोलकाता आणि म्यानमारमधील सीटवी बंदर जोडले जाणार आहे. हा प्रकल्प मिझोरामला जोडला जाणार आहे. इशान्य भारतासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे कोलकाता आणि मिझोराममधील प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. म्यानमारच्या दक्षिण मिझोराममध्ये बंडखोर गटांनी आपले तळ बनवले होते. गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर भारतीय लष्कराने या मोहिमेची आखणी केली.

संयुक्त मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात दोन्ही देशांच्या लष्करांनी मिझोरामच्या सीमेवर बांधण्यात आलेल्या नव्या कॅम्पसना लक्ष्य केले. दुसऱ्या टप्प्यात खतरनाक एनएससीएन(के)चे तळ उद्धवस्त केले. दोन आठवडे चाललेले हे अशा प्रकारचे पहिले ऑपरेशन आहे. भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेस, आसाम रायफल्स आणि अन्य युनिट सहभागी झाले होते. आराकान आर्मीचे लायझामध्ये मुख्यालय असून आईडी स्फोटके तयार करण्यात या आर्मीचे दहशतवादी माहीर आहेत. आराकान आर्मीचे बहुतांश तळ उद्धवस्त करण्यात आले.

First Published on March 15, 2019 5:43 pm

Web Title: indian army carried out mega strikes along myanmar border