News Flash

Indian Army: भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; पाकच्या ७ सैनिकांना कंठस्नान

पाकच्या या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले होते.

भारतीय जवानाचे संग्रहित छायाचित्र ( Photo Source: Indian Express)

पाकिस्तानने सोमवारी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सोमवारी रात्री पाकच्या दोन चौक्यांवर भारतीय जवानांच्या तुकडीने हल्ला केला असून त्यात पाकच्या ७ सैनिकांना कंठस्नान घातल्याचे वृत्त एका हिंदी वृत्त वाहिनीने दिले आहे. भारतीय जवानांनी कृष्णा घाटीजवळील किरपान आणि पिंपल या दोन चौक्यांना लक्ष्य केले. या चौक्यांवर केलेल्या हल्ल्यात पाकचे ७ सैनिक ठार झाले. यापूर्वी पाकिस्तानने जम्मू काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. पाकच्या या हल्ल्यात भारताचे दोन जवान हुतात्मा झाले होते. नायब सुभेदार परमजीत सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर हे या हल्ल्यात हुतात्मा झाले. हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याची माहिती लष्कराने दिली आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी रविवारी नियंत्रण रेषेच्या परिसरात दौरा केला होता. यावेळी त्यांनी काश्मिरींच्या संघर्षाला आमचं पूर्ण समर्थन राहणार असल्याचे विधान केले होते. सोमवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून पाकिस्तानचा गोळीबार सुरू होता. गोळीबार सुरू असतानाच पाक सैन्याने भारतीय जवानांच्या दिशेने रॉकेटचा माराही केला. यावेळी जखमी झालेल्या पाच जवानांपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

aajtak-850x424

 

गेल्या वर्षभरात पाकिस्तानने सीमारेषेवर २२८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. तर गेल्या महिन्यात सातवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले होते. गेल्या काही काळात केरनी सेक्टरमध्ये घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात सीमारेषेपलीकडे दहशतवाद्यांचे अनेक तळ असून ते सातत्याने या भागातून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असतात. गेल्या महिन्याभरात अनेकदा या भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. एप्रिल महिन्यात या परिसरात झालेल्या एका स्फोटात एका भारतीय जवानाचा मृत्यू झाला होता. दहशतवाद्यांनी ही स्फोटके पेरली होती. या भागातील भारतीय लष्कराचा वाढता पहारा पाहून हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये परतले असावेत, असा अंदाज आहे.
भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याने हा तणाव आणखीनच वाढला आहे.

 

cats-4-850x460

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 8:03 am

Web Title: indian army destroys pakistani post 7 pak soldiers died
टॅग : Indian Army
Next Stories
1 दहशतवादविरोधी लढय़ात तुर्कस्तानचाभारताला पाठिंबा
2 न्या. कर्णन यांची वैद्यकीय तपासणी
3 ‘कधीही व कुठेही’ अण्वस्त्र चाचणी करण्याचा उत्तर कोरियाचा इशारा
Just Now!
X