गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव अद्यापही कमी होताना दिसत नाही. एकीकडे चर्चा सुरू असताना दुसरीकडे चीनच्या कुरापती मात्र सुरूच आहे. अशातच सोमवारी रात्री भारतीय जवानांनी सीमा पार करत गोळीबार केला असल्याचा आरोप चीननं केला आहे. लडाखच्या पँगाँग सो नजीक असलेल्या एका पर्वतावर ही चकमक झाल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे.

चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं चिनी लष्कराचे वेस्टर्न थिएटर कमांडच्या प्रवक्त्यांच्या हवाल्यानं पँगाँग सोच्या नजीक चकमक झाल्याचा दावा केला आहे. “भारतीय लष्करानं पँगाँग सो नजीक असलेल्या शेनपाओ या ठिकाणी एलएसी ओलांडली. चर्चेचे प्रयत्न करत असलेल्या पीएलएच्या बॉर्डर पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर भारतीय जवानांनी वॉर्निंग शॉट्स फायर केले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चीनच्या जवानांनाही कारवाई करावी लागली,” असं ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

“भारतानं द्विपक्षीय करारांचं उल्लंघन केलं आहे. यामुळे या क्षेत्रात तणाव आणि गैरसमज वाढतील. ही एक गंभीर कारवाई होती. अशाप्रकारची पावलं उचलणं भारतानं थांबवावं आणि ज्या जवानांनी गोळीबार केला त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी. तसंच अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये याची काळजी भारतानं घ्यानं. पीएलएचे वेस्टर्न कमांडचे सैनिक आपल्या कर्तव्यांचं पालन करतील आणि देशाच्या सुरक्षेसाठीही ते कटिबद्ध आहेत,” असं पीएलएच्या वेस्टर्न थिएटर कमांडचे प्रवक्ते झांग शुई यांनी सांगितलं.

यापूर्वीही चीनची धमकी

“चीनच्या ताकदीची भारताला आठवण करुन देतोय. त्यामध्ये सैन्याच्या ताकदीचीही समावेश आहे. भारताच्या तुलनेत चीनची सैन्य ताकद आधिक आहे. भारत आणि चीन दोन्ही महाशक्ती देश आहेत. पण, जर युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. सीमा युद्ध सुरु झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नाही,” असंही ग्लोबल टाईम्सनं यापूर्वी म्हटलं होतं.