पूर्व लडाखमधील गलवाण खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर वास्तविक नियंत्रण रेषेवर चिनी सैन्यांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून भारतीय लष्कराला विशेषाधिकार देण्यात आले आहेत. चिनी सैन्यांसोबत झालेल्या चकमकीत २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय लष्कराला चीनने आगळीक केल्यास उत्तर देण्याचं पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. इंडिया टीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे

गलवाण खोऱ्यात ज्या ठिकाणी चकमक झाली आहे तिथे योग्य वाटेल ती कारवाई करा सांगत भारतीय लष्कराला केंद्र सरकारकडून मोकळे हात देण्यात आले आहे. दरम्यान तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरु असून चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री असलेले एस जयशंकर यांच्यात फोनवरुन बातचीत झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

भारत आणि चीनने आपल्या नेत्यांमध्ये झालेल्या सहमतीचं पालन केलं पाहिजे असं मत वांग यी यांनी एस जयशंकर यांच्यासमोर मांडलं आहे. तसंच दोन्ही देशांनी मतभेद निर्माण होऊ नयेत यासाठी संवाद व समन्वय बळकट करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत.