भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, यासाठी दहशतवाद्यांना देखील पाठबळ दिले जात आहे. मात्र, पाकिस्तानचे हे प्रयत्न प्रत्येक वेळी अयशस्वी ठरवण्यात भारतीय जवानांना यश येत आहे. आता भारताने पाकिस्तानच्या या घुसखोरीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर अधिकच कडक भूमिका घेत, यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी व घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘एलओसी’वर अतिरिक्त तीन हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की, “एलओसीवर एक अतिरिक्त ब्रिगेड तैनात करण्यात आली आहे. जेणेकरून घुसखोरी रोखली जाईल आणि या निर्णयाचे चांगले परिणाम देखील दिसत पाहायला मिळत आहेत.” तसेच, एलओसीवर तैनात असलेले अतिरिक्त जवान घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यात यशस्वी ठरले आहेत व दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यापासून रोखले जात आहे, असे देखील सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी सैन्यं दहशतवाद्यांची भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यात अयशस्वी ठरले आहे. मोठ्याप्रमाणवरील बर्फवृष्टीमुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत अशा प्रयत्नांना थोपवले जाईल. भारतीय जवान एलओसीवर दक्ष असून नुकतेच काश्मीरमधील गुरेज सेक्टरमधील घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे.

एकीकडे पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमावाद उफाळलेला असताना, दुसरीकडे पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे सुरूच आहे. मात्र, पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय जवानांकडून चोख उत्तर दिले जात आहे.