भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे असे लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांनी सांगितले.

भारतीय लष्कराची एक प्रतिमा आहे, ती चांगली आहे, लष्कराची नेहमीच प्रशंसा झालेली असून आम्ही देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करताना आदर्श कामगिरी केलेली आहे, असे त्यांनी अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्या दीक्षांत समारंभात बोलताना स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिरक्षक सेनेत भारतीय लष्कराची मोठी भूमिका असल्याचे सांगून ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतीय लष्कराच्या कामाची स्तुतीच केली आहे. भारतीय लष्कर हे केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नाही पण या संस्थेकडे एक परिपक्वता व जबाबदारी आहे. एकूण १८३ छात्रांना पदव्या प्रदान करण्यात आल्या त्यात ३७ महिला आहेत. अधिकारी श्रेणी मिळालेल्यात लेफ्टनंट निकिता ए नायर या पुण्याच्या महिलेचा समावेश असून त्या माजी ‘मे क्वीन मिस पुणे’ आहेत, दोन फॅशन स्पर्धात त्यांनी भाग घेतला होता. लेफ्टनंट जनरल वैशाली या भरतनाटय़म् नर्तिका आहेत तर लेफ्टनंट बलवीर सिंग राठोड हा जोधपूर येथील पर्यटन मार्गदर्शकाचा मुलगा आहे.

सुहाग यांनी सदर्न कमांडला भेट दिली. २०१५ मध्ये चेन्नईत जो पूर आला होता त्यावेळी लष्कराने १९५०० जणांना वाचवले व २०००० लोकांना वैद्यकीय मदत तर दोन लाख लोकांना इतर मदत दिली अशी माहिती सुहाग यांना देण्यात आली.