News Flash

त्रिपुरात लष्कर; आसाममध्ये सज्जता ; नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे पडसाद

निमलष्करी दलाचे ५ हजार  जवान ईशान्य भारतात तैनात

| December 12, 2019 03:48 am

निमलष्करी दलाचे ५ हजार  जवान ईशान्य भारतात तैनात

शिलाँग/ नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात ईशान्य भारतात सर्वत्र असंतोष व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी त्रिपुरात लष्कराला पाचारण करण्यात आले; तर या विरोधाचे केंद्र ठरलेल्या आसाममध्ये लष्कराला सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय ईशान्य भारतात निमलष्करी दलांचे ५ हजार जवान पाठवण्यात आले आहेत.

त्रिपुराच्या कंचनपूर व मनु येथे प्रत्येकी एक कॉलम तैनात करण्यात आला असून, आसाममधील बोंगाईगाव व दिब्रुगड येथे काही अनुचित घटना घडल्यास सज्ज राहण्यास एका कॉलमला सांगण्यात आले आहे, असे लष्कराच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

याशिवाय, विधेयकाच्या विरोधातील निदर्शने लक्षात घेऊन आसामसह ईशान्येकडील राज्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी निमलष्करी दलाच्या ५ हजार जवानांना विमानांनी त्या भागात रवाना केले.

केंद्र सरकारने काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तेथे पाठवण्यात आलेल्या निमलष्करी दलांच्या सुमारे २० कंपन्या (२ हजार जवान) तेथून काढून घेण्यात आल्या आहेत. उर्वरित ३० कंपन्या देशाच्या इतर भागांमधून काढून घेऊन ईशान्येत पाठवण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि सशस्त्र सीमा बल (एसएसबी) यांचे हे जवान आहेत.

आंदोलकांचा पोलिसांशी संघर्ष

गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी बुधवारी आसामच्या रस्त्यांवर उतरलेल्या हजारो लोकांचा पोलिसांशी संघर्ष झाला. आसाम करारावर होण्यास कारणीभूत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या ६ वर्षांच्या हिंसक आंदोलनानंतर प्रथमच राज्य प्रचंड अशा गोंधळात लोटले गेले आहे.

कुठल्याही पक्षाने किंवा विद्यार्थी संघटनेने बंदचे आवाहन केलेले नसले, तरी बहुसंख्य विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या निदर्शकांच्या सुरक्षा दलांशी चकमकी झडल्या. सचिवालयासमोरही अशीच एक चकमक झाली. पोलिसांनी निदर्शकांवर अश्रुधुराच्या फैरी झाडल्या आणि त्यांच्यावर छडीमारही केला, तेव्हा प्रत्युत्तरात निदर्शकही आक्रमक झाले.

लोकसभेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत केल्यानंतर त्यावर राज्यसभेत जोरदार चर्चा होत असताना अनेक भागांत निदर्शने होत असलेले आसाम धुमसत आहे.

सचिवालयासमोर झालेल्या निदर्शनांमध्ये अनेक आंदोलक जखमी झाल्याचे विद्यार्थी नेत्यांनी दूरचित्रवाहिन्यांवर सांगितले.

अनेक संतप्त विद्यार्थ्यांनी सचिवालय परिसराजवळील रस्ते अडवले आणि जी.एस. रोडवर उभारलेले अडथळे मोडून टाकले. यामुळे पोलिसांना कारवाईस उद्युक्त व्हावे लागले. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या फैरी झाडल्या आणि छडीमार केला, तेव्हा आंदोलक अश्रुधुराची नळकांडी पोलिसांवर परत फेकताना दिसले.  आंदोलकांनी सरकारच्या योजनांची जाहिरात करणारे फलक खाली खेचून पेटवून दिले.

दरम्यान, अंतर्गत परवाना व्यवस्था (आयएलपी)  मणिपूरलाही लागू करणाऱ्या आदेशावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता मणिपूरलाही नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक लागू होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत दोन दिवसांपूवी असे सांगितले होते की, अंतर्गत परवाना व्यवस्था ही मणिपूरलाही लागू करण्यात येईल. नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ लागू केल्याने होणाऱ्या परिणामांची भीती दूर करण्यासाठी त्यांनी हे आश्वासन दिले होते.

नागालँड सरकारने अंतर्गत परवाना व्यवस्था दिमापूर जिल्ह्य़ालाही लागू केली असल्याचे एका अधिसूचनेत म्हटले आहे. हे राज्य १९६३ साली अस्तित्वात आले, तेव्हापासून राज्यात ही व्यवस्था लागू करण्यात आली, मात्र  व्यावसायिक केंद्र असलेला दिमापूर जिल्हा वगळला होता.

ईशान्येकडील राज्यांना विधेयकात संरक्षण- रिजीजू

नवी दिल्ली : ईशान्येकडील सर्वच राज्यांना नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकात संरक्षण देण्यात आले आहे, असे केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी बुधवारी एका कार्यक्रमात सांगितले. ते म्हणाले की, देशाच्या इतिहासात प्रथमच एका महत्त्वाच्या विधेयकावर ईशान्येकडील लोकांशी सल्लामसलत करण्यात आली आहे. ईशान्येतील राज्यात मोठय़ा प्रमाणावर आंदोलन सुरू आहे याची मला कल्पना आहे. पण ते ज्या काळजी व चिंतेपोटी हे आंदोलन करीत आहेत त्या सर्वाचे निराकरण विधेयकात केलेले आहे.  संपूर्ण ईशान्येला नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकात संरक्षण देण्यात आले आहे. ईशान्येकडील राज्यांनी आता कुणाच्या गैरप्रचाराला बळी पडू नये असे आम्हाला वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 3:48 am

Web Title: indian army in tripura citizenship amendment bill anti citizenship bill protest zws 70
Next Stories
1 रोहिंग्यांविरोधातील कारवाईत वंशहत्येचा हेतू नव्हता- स्यू की
2 इक्बाल मिर्चीच्या ६०० कोटींच्या मालमत्तेवर टांच
3 Citizenship Amendment Bill protests : ईशान्य भारतात भडका..
Just Now!
X