पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तान बरोबर झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची सीमारेषेजवळ एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याची योजना आहे. पाकिस्तानने पुन्हा हवाई हल्ल्याचा प्रयत्न केल्यास तो उधळून लावण्याच्या रणनिती यामागे आहे. हवाई सुरक्षा यंत्रणा उभी केल्यानंतर पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा प्रयत्न सीमारेषेजवळच उधळून लावता येईल असे एएनआयने लष्करातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

लष्कर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर एअर डिफेन्स युनिट तैनातीच्या निर्णयाप्रत आले आहे. जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये ज्या ठिकाणी एअर डिफेन्स युनिट आहेत. त्या ठिकाणांचा लष्कराने आढावा घेतल्यानंतर  एअर डिफेन्स युनिट सीमा रेषेच्या आणखी जवळ तैनात करण्याची गरज जाणवली.

भारतीय लष्कराच्या या एअर डिफेन्स सिस्टिममध्ये स्वदेशी बनावटीचे आकाश क्षेपणास्त्र, रशियाच्या क्वाड्राटचा समावेश होतो. लष्कराला लवकरच डीआरडीओ आणि इस्त्रायलची संयुक्त निर्मिती असलेली एमआर-सॅम एअर डिफेन्स सिस्टिमही मिळणार आहे.

भारताने २६ फेब्रुवारीला बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पाकिस्तानची एफ-१६ आणि जेएफ-१७ विमाने भारतीय हद्दीत घुसली होती. त्यावेळी सुखोई आणि मिग-२१ बायसन विमानांनी पाकिस्तानचा डाव यशस्वी होऊ दिला नव्हता. या डॉगफाईटमध्ये पाकिस्तानचे एक एफ-१६ विमानही पाडले होते.