News Flash

दोनच्या बदल्यात तीन जवानांचा शिरच्छेद

२०११ साली कारवाई केल्याचे ‘द हिंदू’चे वृत्त

दोनच्या बदल्यात तीन जवानांचा शिरच्छेद

२०११ साली कारवाई केल्याचे द हिंदूचे वृत्त

उरी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक्सच्या पुराव्यांवरून वादंग माजलेले असतानाच २०११ साली पाकिस्तानने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्याचा बदला भारताने पाकिस्तानच्या तीन जवानांचा शिरच्छेद करून घेतला असल्याचे वृत्त ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने दिले आहे.

भारतीय कमांडो पथकाने केलेल्या त्या कारवाईचे सांकेतिक नाव ‘ऑपरेशन जिंजर’ असे होते असे त्या वेळी लष्कराच्या जम्मू-काश्मीरमधील कुपवाडास्थित २८व्या डिव्हिजनचे नेतृत्व करणारे मेजर जनरल (निवृत्त) एस. के. चक्रवर्ती यांनी ‘द हिंदू’ला सांगितल्याचे वृत्तात म्हटले आहे. चक्रवर्ती यांनी ती मोहीम आखून तडीस नेली होती.

३० जुलै २०११च्या दुपारी जम्मू- काश्मीरमधील कुपवाडाजवळच्या गुगलधर पर्वतरांगांमधील भारतीय लष्कराच्या ठाण्यावर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात सहा भारतीय जवान मारले गेले होते. त्यापैकी हवालदार जयपालसिंग अधिकारी आणि लान्स नाइक देवेंदर सिंग यांचा शिरच्छेद करून त्यांची मुंडकी पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेपलीकडे नेली होती. या  हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करानेही ३० ऑगस्ट  रोजी नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. पाकव्याप्त काश्मीरमधील जोर या ठिकाणाजवळील पोलीस चौकी नावाचे लष्करी ठाणे, हिफाजत आणि लष्दत ही ठाणी हल्ल्यासाठी निश्चित करण्यात आली. मंगळवार, ३० ऑगस्ट २०११ ही तारीख हल्ल्यासाठी नक्की करण्यात आली. दुसऱ्या दिवशी ईद होती म्हणून जाणूनबुजून तो दिवस निवडला होता, कारण त्या वेळी पाकिस्तानी सैन्य सर्वाधिक गाफील असते. तसेच कारगिल युद्धापासून अन्य कारवायांमध्ये मंगळवारी सैनिकांना कायम यश मिळत असल्याने मंगळवार शुभ वार समजला जात होता.

प्रत्यक्ष हल्ल्यासाठी लष्करातील सुप्रसिद्ध पॅरा कमांडो पथकातील २५ सैनिक निवडले होते. ते हल्ल्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे २९ ऑगस्टला नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश करून पोलीस चौकी या ठाण्याच्या जवळ जाऊन दबा धरून बसले. त्यांनी पाकिस्तानी ठाण्याच्या आजूबाजूला सुरुंग पेरले. त्यानंतर कमांडो आपापल्या जागा घेऊन दबा धरून बसले. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना चार पाकिस्तानी सैनिक सुरुंग लावल्याच्या ठिकाणी येताना दिसले. ते सुरुंगांजवळ येताच कमांडोंनी स्फोट घडवून आणला. त्यात चारही सैनिक गंभीर जखमी झाले. कमांडोंनी लगबगीने तीन पाकिस्तानी सैनिकांची मुंडकी छाटली. त्यासोबत त्यांच्या गणवेशावरील हुद्दे दाखवणारे बिल्ले आणि त्यांच्या एके-४७ बंदुकाही कमांडोंनी काढून घेतल्या. त्यानंतर एका सैनिकाच्या मृतदेहाखाली सुरुंग लावण्यात आले. त्यांना तेथे दबा धरून बसलेल्या कमांडोंच्या दुसऱ्या पथकाने ठार मारले. या दुसऱ्या पथकाला पाकिस्तानच्या अन्य दोन सैनिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मागे लपलेल्या कमांडोंच्या तिसऱ्या पथकाने त्यांना टिपले.  या सर्व कारवाईला ४५ मिनिटे लागली. पहिले पथक दुपारी १२ वाजता भारतीय हद्दीत परतले तर शेवटचे पथक दुपारी अडीच वाजता भारतीय हद्दीत परतले.

भारतीय कमांडो पाकिस्तानव्याप्त प्रदेशात ४८ तास होते. त्यांनी तीन पाकिस्तानी सैनिकांची मुंडकी, बिल्ले आणि बंदुका विजयाची निशाणी म्हणून परत आणली होती. त्यांची नावे सुभेदार परवेझ, हवालदार आफताब आणि नाइक इम्रान अशी होती. भारतीय लष्कराने पुरावे म्हणून त्यांची छायाचित्रे घेऊन मुंडकी पुरून टाकली. दोन दिवसांनी एका वरिष्ठ जनरलनी मुंडकी जाळून त्यांची राख किशनगंगा नदीत फेकून देऊन पुरावे नष्ट करण्यास सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2016 1:46 am

Web Title: indian army killed 8 pakistanis in 2011 surgical strike
Next Stories
1 मंगळावरील शेतीसाठी नासाकडून प्रयोग
2 फोर्ब्स नियतकालिकाच्या यादीत पाच भारतीय अमेरिकी व्यक्ती
3 दिल्लीत मोहल्ला क्लिनिक उभारण्यात विलंब
Just Now!
X