भारतीय लष्कराच्या ४ कर्मचाऱ्यांच्या चमूने ऑक्सिजन सिलिंडर न वापरता माऊंट एव्हरेस्ट शिखरावर यशस्वीरीत्या चढाई केली असून, प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठय़ाशिवाय जगातील सर्वोच्च शिखर पादाक्रांत करणारा हा पहिला चमू ठरला आहे.

कुंचोक तेंदा, केलशांग दोरजी भुतिया, कैदेन पांजुर आणि सोनम फुन्स्तोक अशा या चार गिर्यारोहकांची नावे आहेत. एकूण १४ सदस्यांच्या चमूपैकी उग्र्येन तोपग्ये, नवांग गेलेक आणि कर्मा झोपा या तीन गिर्यारोहकांनी जादा प्राणवायूच्या मदतीने माऊंट एव्हरेस्ट सर केले.

ऑक्सिजन सिलिंडरचा वापर न करता एव्हरेस्टवर चढाई करण्याच्या उद्देशाने आम्ही १० जणांचा चमू तयार केला होता आणि त्यांपैकी चौघांना जगातील सर्वोच्च शिखरावर प्राणवायूशिवाय पाठवण्यात यश मिळवले, असे स्नो लॉयन एव्हरेस्ट एक्स्पीडिशन २०१७ चे प्रमुख विशाल दुबे यांनी सांगितले. कुठल्याही चमूने जादा प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही ते म्हणाले.

आजवर ४ हजारांहून अधिक लोकांनी ८८४८ मीटर उंचीच्या या शिखरावर चढाई केली असून, त्यापैकी फक्त १८७ जणांनी हे काम जादा प्राणवायूशिवाय आणि वैयक्तिक पातळीवर केले आहे. या मोहिमेतील ६ शेर्पा मार्गदर्शकही प्राणवायूच्या मदतीने एव्हरेस्टवर पोहचले. २१ मे रोजी एव्हरेस्ट चढलेल्या या चमूचे सदस्य शुक्रवारी काठमांडूला परतले.