भारत आणि चीनमध्ये सध्या तणाव असून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु असतानाच दोन्ही देशांच्या सैन्य समोरासमोर आल्याची माहिती मिळत आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशाचे सैन्य एकमेकांसमोर आले होते. यावेळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे तणाव वाढण्याची भीती आहे.

भारतीय लष्कराकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांचे सैन्य आपापसात भिडले. यामध्ये भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. यानंतर दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी तणाव वाढू नये यासाठी आपापसांत चर्चा करत आहेत.

दरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमारेषा ओलांडली आणि सैन्यावर हल्ला केला असा दावा चीनच्या ग्लोबल टाइम्सने परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्याने केला आहे. यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले असंही त्यांनी सांगितलं आहे. यानंतर चीनने भारतीय अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवला असून सीमेवरील परिस्थिती बिघडेल असं काही करु नये असं म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी चीनलगतच्या सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं होतं. सध्या दोन्ही देशांत जे मतभेद आहेत, ते संवादाच्या माध्यमातून मिटतील,असा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता. भारतीय लष्करी अकादमीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, कोअर कमांडर पातळीवर आम्ही चीनशी संवाद सुरू केला आहे. अलीकडेच बऱ्याच प्रमाणात सैन्य हलवण्यात आले असून निरंतर संवादातून उर्वरित मतभेद मिटवून हा प्रश्न सोडवला जाईल. दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्याने माघार सुरू केली आहे. गलवान नदी भागात दोन्ही देशांनी टप्प्याटप्प्याने माघार घेतली असून आतापर्यंतचा सर्वात फलदायी संवाद दोन्ही देशात झाला आहे.