लडाखमधील गलवान खोऱ्यात सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षामुळे भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव असतानाच चीनने पुन्हा एकदा आगळीक करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी सैनिकांनी पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करत नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय सैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्यांना रोखलं असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय सैनिकांनी प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं सांगत चीनला इशारा दिला आहे.

“भारतीय लष्कर संवादाच्या माध्यमातून शांतता राखण्यासाठी वचनबद्ध आहे मात्र याचवेळी देशाच्या प्रादेशिक अखंडतेची सुरक्षा करण्यासाठीही तितकंच कटिबद्ध आहे,” असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

भारतीय लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेक परिसरात चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारतीय सैनिकांनी त्यांना वेळीच रोखलं. २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्यांकडून हा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान यामुळे दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असून ब्रिगेड कमांडर स्तरावर फ्लॅग मीटिंग सुरु आहे.

याआधी १५ जूनला भारत आणि चिनी सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला होता. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते तर चीनचंही मोठं नुकसान झालं होतं. नंतर चर्चेच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्यात आला होता. पण अद्यापही दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत.