29 November 2020

News Flash

पाकिस्तान सुधारत नाही, तोपर्यंत सीमेवर इंडियन आर्मीचे ‘स्पेशल ऑपरेशन्स’च चालूच राहणार

पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक हरकतीला आता त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळत असून यापुढेही हेच धोरण कायम ठेऊन नियंत्रण रेषेवर पाकिस्तानला दबावाखाली ठेवण्याची भारतीय लष्कराची रणनिती असेल.

सीमेवर पाकिस्तानच्या प्रत्येक नापाक हरकतीला आता त्याच भाषेत प्रत्युत्तर मिळत असून यापुढेही हेच धोरण कायम ठेऊन नियंत्रण रेषेवर पाकिस्तानला दबावाखाली ठेवण्याची भारतीय लष्कराची रणनिती असेल. कट्टरपंथीय विचारधारेकडे झुकलेल्या युवकांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे असे मत लष्करी कमांडर्सच्या परिषदेत व्यक्त झाले तसेच दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरु असताना त्यात अडथळे आणण्यासाठी दगडफेक केली जाते. दगडफेकीच्या या वाढत्या घटनांचाही कमांडर्सच्या परिषदेत आढावा घेण्यात आला.

अंदाजित आकडेवारीनुसार यावर्षी ४० पेक्षा जास्त युवकांनी दहशतवादाचा मार्ग निवडला. मागच्यावर्षी हीच संख्या १२८ होती. यावर्षी आतापर्यंत सुरक्षा पथकांनी ५१ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे पण त्याचवेळी आपले २७ जवानही शहीद झाले.

शांतता प्रस्थापित करणे तसेच मार्ग भरकटून कट्टरपंथीय विचारधारेकडे निघालेल्या या युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याला पहिले प्राधान्य दिले पाहिजे असे या कमांडर्सचे मत आहे. युवकांनी हिंसाचार सोडावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत या कमांडर्स परिषदेत व्यक्त झाले.

सप्टेंबर २०१६ मध्ये भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये आणखी वाढ झाली. २०१७ मध्ये नियंत्रण रेषेवर ८६० आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने १२० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. चालू वर्षाच्या पहिल्या ११० दिवसातच पाकिस्तानने ७४७ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय लष्करानेही अनेकदा पाकिस्तानात घुसून स्पेशल ऑपरेशन्स केले आहेत. पाकिस्तानकडून भारतामध्ये होणारी दहशतवादाची निर्यात जो पर्यंत बंद होत नाही, तो पर्यंत आम्ही थांबणार नाही असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:10 am

Web Title: indian army pakistan cease fire violation
टॅग Indian Army,Pakistan
Next Stories
1 कर्करोग निदानासाठी कमी वेदनादायी चाचणी
2 जगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन
3 देशातल्या सर्वात गरीब मुख्यमंत्र्यांचा विचार बदलला, नवीन घर आणि SUV कारची केली मागणी
Just Now!
X