काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात प्रादेशिक सेनेच्या जवानाने दहशतवाद्यांना माहिती देण्याऐवजी शहीद होणं पसंत केलं. लान्स नायक मुख्तार अहमद मलिक यांना दहशतवाद्यांनी जेव्हा लष्कर सैनिकांची माहिती विचारली तेव्हा त्यांनी सांगितलं की, ‘तुम्हाला गोळी मारायची असेल तर मारा, पण मला प्रश्न विचारु नका’. मुख्तार अहमद मलिक आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याने घरी आले होते. एका अपघातात त्यांचा मुलगा जखमी झाला होता. रुग्णालयात चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर १५ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, जेव्हा अंत्यसंस्काराची तयारी सुरु होती तेव्हा काही दहशतवादी ४३ वर्षीय मुख्तार अहमद मलिक यांच्या घरात घुसले. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामधील चुरत हे त्यांचं गाव आहे. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आणि त्यांचे मित्र मुख्तार अहमद मलिक यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते. मलिक घरी पोहोचताच त्यांनी त्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.

मलिक घराच्या पहिल्या माळ्यावर होते. दहशतवादी त्यांना लष्कर जवानांना कुठे तैनात करण्यात आलं आहे याची माहिती मागू लागले. तिथे उपस्थित लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मलिक यांनी दहशतवाद्यांना सांगितलं की, ‘जर तुम्हाला मला गोळी मारायची असेल तर मारा, पण मला प्रश्न विचारु नका’. यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मलिक यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दहशतवाद्यांना तेथून पळ काढला.

दहशतवाद्यांनी पत्रकार असल्याची बतावणी करत जवानाच्या घरात प्रवेश केला आणि यानंतर जवानाची गोळी झाडून हत्या केली. घरात मलिक दिसताच दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि तिथून पळ काढला, असे मलिक यांच्या एका नातेवाईकांनी सांगितले. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मलिक यांच्या हत्येनंतर स्थानिक माध्यमांचे पत्रकार वार्तांकनासाठी मलिक यांच्या घरी गेले असता नातेवाईकांनी तीव्र विरोध केला. अखेर काही नातेवाईकांनी घडलेला प्रकार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितला. दोन वर्षानंतर मलिक घरी आला होता. मुलाच्या मृत्यूमुळेच तो घरी आला होता, अशी माहितीही नातेवाईकांनी दिली. गेल्या १८ महिन्यात दहशतवाद्यांनी सुट्टी घेऊन घरी आलेल्या चार जवानांची हत्या केली आहे. हे चारही जवान दक्षिण काश्मीरमधील निवासी होते.