करोना व्हायरसची दहशत वाढते आहे. अशात खबरदारीचा उपाय म्हणून अनेक निर्णय घेतले जात आहेत. भारतीय लष्करही त्यात मागे नाही. भारतीय लष्करानेही विविध ९० प्रकारच्या कोर्सेसना स्थगिती दिली आहे. लष्कराशी संबंधित प्रशिक्षण देणारे हे कोर्सेस आहेत. ज्यांना स्थगिती देण्यात आली आहे. लष्कराने हा मोठा निर्णय घेतला आहे. या कोर्समध्ये जास्तीत जास्त जवान आणि अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र करोनाची दहशत लक्षात घेऊन आणि खबरदारीचा उपाय म्हणून हे ९० प्रकारचे प्रशिक्षण कोर्सेस पुढे ढकलण्यात आले आहेत. देशभरात करोनाग्रस्तांची संख्या १०० च्या वर पोहचली आहे. अशात आता लष्करानेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

१६ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत ९० कोर्सेस घेतले जाणार होते. या कोर्सेसमध्ये ६ हजार लोकांचा समावेश होता. या सहा हजार लोकांमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून हे कोर्सेस पुढे ढकलण्यात आले आहेत अशी माहिती लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ANI शी बोलताना दिली.

सध्या या सगळ्या कोर्सेसना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. देशात आणि राज्यांमध्ये करोना व्हायरसचं थैमान आटोक्यात आलं तर हे कोर्सेस कधी घ्यायचे याबाबतचा निर्णय घेऊ असंही लष्कराने म्हटलं आहे. काही कोर्सेस असे होते ज्यामध्ये लष्करातील महिला कॅडेट्सचा समावेश असणार होता. मात्र या प्रशिक्षणाच्या कोर्सेसना तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात येते का ते पाहिलं जाणार आहे. लष्करातील ज्या कॅडेट्सना सुट्टी हवी आहे त्यांनाही ती देण्यात येते आहे असंही लष्कराने म्हटलं आहे. लष्कराने १५ हजार लोकांच्या विलिगीकरणाची व्यवस्था केली आहे असंही वृत्त एएनआयने दिलं आहे.