26 September 2020

News Flash

‘भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज!’

स्वदेशी शस्त्रांच्या निर्मितीत वाढ

संग्रहित छायाचित्र.

भारतीय लष्कर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे, असं संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी काल, शुक्रवारी लोकसभेत सांगितलं. भारतानं १९६२ च्या चीन युद्धातून धडा घेतला आहे, असं त्यांनी दोनच दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी यासंबंधी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जेटली यांनी ही माहिती दिली. लष्कराच्या तयारीबाबत कोणतीही शंका नाही. कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास लष्कर सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं. आपल्या सुरक्षा दलांजवळ कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्यासाठी पुरेसा शस्त्रसाठा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय लष्कराकडं पुरेसा शस्त्रसाठा नसल्याचा अहवाल कॅगनं अलिकडेच दिला होता. त्याचा उल्लेख करत वेणुगोपाल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर अहवालात नोंदवलेलं निरीक्षण हे विशिष्ट कालावधीतील आहे. त्यानंतर बरीच प्रगती झालेली आहे. ही प्रक्रिया सुरुच राहणारी आहे. त्यामुळं आपल्या लष्कराच्या शस्त्रसज्जतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नयेत, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. भारतानं गेल्या काही वर्षांत खूपच प्रगती केली आहे. स्वदेशी शस्त्रनिर्मितीमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व शस्त्रनिर्मितीचे कारखाने सुरुच राहतील. या कारखान्यांमध्ये कर्मचारी कपात होणार नाही,असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, भारतानं गेल्या काही दशकांत अनेक आव्हाने पेलली आहेत. त्या प्रत्येक आव्हानातून देश अधिक मजबूत झाला आहे. १९६२ च्या चीन युद्धातून भारत अनेक धडे शिकला आहे. आमची लष्करी दले सक्षम आहेत. आजच्या काळातही देशाला शेजारी देशांकडून आव्हाने आहेत, असं त्यांनी राज्यसभेत छोडो भारत चळवळीच्या पंचाहत्तरीनिमित्त विशेष चर्चेदरम्यान सांगितलं होतं. १९६२ च्या तुलनेत लष्करी दले १९६५ व १९७१ च्या युद्धात जास्त सक्षम होती हे दिसून आलेच आहे. १९६५ व १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारताचा विजय झाला. काही आव्हानं अजूनही आहेत, हे मान्य आहे. पण आमचे शूर सैनिक देशाचे रक्षण करण्यास सक्षम आहेत, असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 8:29 am

Web Title: indian army prepared face any eventuality defence minister arun jaitley lok sabha india china doklam
टॅग Indian Army
Next Stories
1 पाकव्याप्त काश्मीरसाठी पावले टाका
2 लक्ष्यभेदी कारवाईने परिपक्वतेचे दर्शन
3 राज्यसभेत अधिक कामकाज
Just Now!
X