पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा चिनी लष्कराचा आरोप भारतीय लष्कराने फेटाळला आहे. चिनी सैन्यांनी हवेत गोळीबार केला, तसंच भारतीय चौक्यांच्या जवळ आले होते अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली आहे. भारतीय लष्कराकडून सोमवारी संध्याकाळी लडाखमध्ये झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पिपल्स लिबरेशन आर्मी सतत कराराचं उल्लंघन करत असून आक्रमकता दाखवत असल्याचं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

भारतीय लष्कराने सांगितलं आहे की, “भारत नियंत्रण रेषेवर शांतता राहावी यासाठी कटिबद्द असताना चीन सतत चिथावणीखोर गोष्टी करत आहे. भारताने कधीही नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलेला नाही तसंच गोळीबारसारख्या आक्रमक गोष्टी केलेल्या नाहीत”.

“लष्करी तसंच राजकीय स्तरावर चर्चा सुरु असताना पिपल्स लिबरेशन आर्मी सतत कराराचं उल्लंघन करत असून आक्रमक गोष्टींचा अवलंब करत आहे. ७ सप्टेंबरला चिनी सैन्यांनी नियंत्रण रेषेवर आपल्या फॉरवर्ड पोस्टच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. त्यांना रोखण्यात आलं असता चिनी सैन्यांनी हवेत गोळीबार करत आपल्या सैन्याला चिथावण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी आपल्या सैन्याने संयम तसंच जबाबदारीने परिस्थिती हाताळली,” अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.

“भारतीय लष्कर शांतता राखण्यास कटिबद्ध आहे. मात्र यावेळी कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय अखंडता आणि सार्वभौमत्व राखण्यासही तयार आहोत. चिनी लष्कराकडून देण्यात आलेली माहिती ही त्यांच्या स्थानिक तसंच आंतरराष्ट्रीय समूहाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे,” असं भारतीय लष्कराने सांगितलं आहे. सोमवारी संध्याकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास लडाखमध्ये गोळीबार झाला. दोन्ही देशांमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा सुरु असतानाच हा गोळीबार झाला आहे.