जम्मू-काश्मीरच्या कृष्णा घाटी भागात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात गंभीररित्या जखमी झालेला ३४ वर्षीय जगदीश नाईक या भारताय जवानाचा बुधवारी उपचारांदरम्यान मृत्यू झाला. यामुळे पाकिस्तानच्या हल्ल्यात आणखी एक जवान शहीद झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

२० जानेवारी रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी परिसरात पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनादरम्यान जखमी झालेला उत्तराखंडचा जवान जगदीश नाईक हा स्लिंटर्सचा मारा झाल्याने गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्याचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्याच्यामागे पत्नी उषादेवी आणि दोन लहान मुले आहेत. लष्कराचे दक्षिण विभागाचे प्रवक्ते कर्नल एन. एन. जोशी यांनी ही माहिती दिली.

जगदीश नाईक हे शूर आणि प्रामाणिक जवान होते. देश त्यांचे सर्वोच्च बलिदान नेहमीच लक्षात ठेवील, असे कर्नल जोशी यांनी म्हटले आहे.
१७ जानेवारीपासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये बीएसएफचे २ जवान, ४ लष्कराचे जवान शहीद झाले तर ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सीमेपलिकडून होत असलेल्या या गोळीबारात हजारो लोकांना त्यांचे घर सोडावे लागले असून निर्वासित कॅम्पमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.