25 February 2021

News Flash

शूर अधिकाऱ्याची मृत्यूला हुलकावणी

सीआरपीएफचे अधिकारी चेतन चिता घरी परत

| April 6, 2017 02:20 am

गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी एम्समध्ये जाऊन चिता यांची भेट घेतली. आपल्याला या अधिकाऱ्याचा ‘अभिमान’ असल्याचे ते म्हणाले.

१६ दिवस कोमात, ३० दिवस आयसीयूत राहून सीआरपीएफचे अधिकारी चेतन चिता घरी परत

शत्रूने झाडलेल्या ९ गोळ्या अंगात ठिकठिकाणी शिरलेल्या..त्यापैकी एक तर मेंदूत शिरलेली..तब्बल १६ दिवस कोमात राहिल्यानंतर महिनाभर आयसीयूत वास्तव्य..अशा खडतर परिस्थितीला तोंड देत सुरक्षा दलाचा एक बहादूर अधिकारी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूला हुलकावणी देऊन बुधवारी रुग्णालयातून घरी रवाना झाला. डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूशी लढून बरे होण्याचे वर्णन ‘चमत्कार’ असे केले आहे.

मूळचे राजस्थानचे असलेले चेतन चिता हे काश्मीर खोऱ्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४५ व्या बटालियनचे कमांडिंग अधिकारी होते. काश्मीरच्या हज्जन भागात दोन विदेशी दहशतवादी लपून बसल्याची गुप्तचरांकडून माहिती मिळाल्यानंतर लष्कर, सीआरपीएफ व राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने गेल्या १४ फेब्रुवारीला या भागाला वेढा दिला. या वेळी त्यांच्याशी दहशतवाद्यांशी जोरदार चकमक उडाली होती.

या चकमकीत गंभीर जखमी झालेले चिता यांना श्रीनगरच्या बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात येऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून त्यांना एअर अँब्युलन्सने त्याच रात्री अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले.

चिता यांना एम्समध्ये आणले त्या वेळी ते कोमामध्ये होते. त्यांचा मेंदू, उजवा डोळा, पोट, दोन्ही खांदे, डावा हात आणि पाश्र्वभाग या ठिकाणी बंदुकीच्या गोळ्या शिरल्या होत्या. त्यांच्या धडावर ठिकठिकाणी फ्रॅक्चर होते आणि त्यांच्या डोळ्याचा पडदा फाटला होता. येथे आणल्यानंतर २४ तासांच्या आत बंदुकीची जखम असलेला कवटीचा एक भाग काढून टाकण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

चिता यांच्या शरीरावरील खोल जखमा चिघळत होत्या, मात्र आयसीयूतील तज्ज्ञांनी त्यांची सतत काळजी घेतली. प्लास्टिक सर्जरी चमूने त्यांच्या जखमा स्कीन ग्राफ्टिंगने भरल्या. जवळजवळ दीड महिने चाललेल्या उपचारानंतर १६ मार्चला त्यांना वॉर्डामध्ये हलवण्यात आले. बुधवारी त्यांना सुटी देण्यात आली.

चिता आता बरे झाल्याची पत्रकारांसमोर घोषणा करताना एम्समधील ट्रॉमा सर्जरीचे प्राध्यापक सुबोध कुमार यांनी ही बाब ‘चमत्कारापेक्षा कमी नसल्याचे’ सांगितले. त्यांच्या परतण्यातून एका योद्धय़ाचे धैर्य दिसून आले असल्याचे ट्रॉमा सेंटरचे प्रमुख अनुराग श्रीवास्तव म्हणाले. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरून या अधिकाऱ्याच्या साहसाचे मनापासून अभिनंदन केले.

गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी एम्समध्ये जाऊन चिता यांची भेट घेतली. आपल्याला या अधिकाऱ्याचा ‘अभिमान’ असल्याचे ते म्हणाले.

पत्नीचा दृढ विश्वास

माझ्या पतीचा प्रवास संपलेला नाही. ते गणवेश अंगावर चढवून पुन्हा कामावर जातील, तो दिवस त्यांच्यासाठी खरा पुरस्कार असेल, असे चकमकीत जखमी झालेले चिता यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांच्यासोबत असलेली त्यांची पत्नी उमा सिंह यांनी सांगितले. ते कोमात असल्याचे डॉक्टर सांगत होते. मात्र जेव्हा-जेव्हा मी त्यांना भेटत असे आणि त्यांचा हात हाती घेत असे, तेव्हा बोटे हलवून ते मला प्रतिसाद देत असत. त्यामुळेच ते परत येणार असल्याचा माझा विश्वास दृढ होत होता, असे उमा म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:20 am

Web Title: indian army soldier out from coma
Next Stories
1 व्हॉट्सअॅपच्या गोपनीयतेचे धोरण घटनापीठाकडे
2 सीरियातील रासायनिक हल्ल्यामागे असाद यांचा हात
3 गुजरात, हिमाचलमध्ये मतपत्रिका वापरा
Just Now!
X