23 October 2019

News Flash

महिलांचा सैनिक होण्याचा मार्ग मोकळा

पहिल्यांदाच भारतीय लष्करामध्ये महिलांना जवान म्हणून संधी देण्यात येणार

महिला जवान (प्रातिनिधिक फोटो)

भारतीय लष्कराने गुरुवारपासून महिलांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. लष्करातील ‘मिलिटरी पोलिस’ विभागासाठी ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी महिलांना लष्करात भरती करुन घेण्याची घोषणा केल्यानंतर चार महिन्यांनी ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लष्कराने यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली असून भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ऑनलाइन पद्धतीने हे अर्ज भरता येणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख ८ जून असणार आहे.

भारतीय सुरक्षा दलांमध्ये महिलांना आजवर केवळ अधिकारी पदावर नियुक्त केले जात होते. वैद्यकीय, कायदा, अभियांत्रिक अशा लष्काराच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये महिलांना समाविष्ट करुन घेतले जात होते. मात्र आता तरुणींना थेट लष्करी जवान बनण्याची संधी उपलब्ध होणार असून करियरचा नवा पर्याय म्हणून याकडे पाहता येणार आहे.

महिलांना मिलिटरी पोलिस विभागात जवान म्हणून नियुक्त करण्याची कल्पना सर्वप्रथम लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मांडली होती. सीतारामन यांनीही या कल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत महिलांना लष्करात जवान म्हणून संधी देण्यात येईल यासंदर्भातील घोषणा जानेवारी महिन्यात केली होती. ‘मिलिटरी पोलिस’ या विभागामध्ये टप्प्याटप्प्याने महिलांना सामावून घेण्यात येईल. या विभागामध्ये महिला जवानांचे संख्याबळ २० टक्क्यांपर्यंत नेण्याची संरक्षण खात्याची योजना असल्याचेही सीतारमन यांनी सांगितले होते.

महिला जवानांच्या खांद्यावर देणार ही जबाबदारी-

> लष्कर आणि पोलिस यांच्या संयुक्त मोहिमांमध्ये मदत करणे

> तपासणी नाक्यांवर तसेच नाकाबंदीवेळी महिलांची झडती घेणे

> निर्वासितांच्या गर्दीचे व्यवस्थापन करणे

> युद्धसदृश परिस्थितीत सीमेजवळील गावांमधून लोकांचे स्थलांतर करण्यासाठी पोलिस तसेच प्रशासनाला मदत करणे

> बलात्कार, विनयभंग, चोरी आदी गुन्ह्यांचा तपास करणे

> युद्धबंद्यांच्या छावण्यांचे व्यवस्थापन करणे

> स्थलांतर करण्यासाठी पोलिस तसेच प्रशासनाला मदत करणे

First Published on April 26, 2019 8:55 am

Web Title: indian army starts process to recruit women soldiers