नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराकडून दहशतवादी तळांवर लक्ष्यभेदी हल्ले करण्यात येत असून पाकिस्तानातून घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्यापूर्वीच त्यांचा बंदोबस्त करण्यात येत आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी सांगितले. देश करोनाशी लढा देत असताना लष्करही महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि सशस्त्र दले देशाचे रक्षण करण्यासाठी सिद्ध आहेत, सशस्त्र दले कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत, भारताचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे राजनाथसिंह यांनी देशाला आश्वस्त केले आहे. करोनाचा जगभरात फैलाव झालेला असतानाही पाकिस्तान नियंत्रण शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे, गेल्या काही आठवडय़ांपासून घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसविण्याचा प्रयत्नही केला जात आहे. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी गुरुवारी आणि शुक्रवारी नियंत्रण रेषेवर विविध ठिकाणांना भेटी दिल्या. लष्कराला दक्ष राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या, असेही संरक्षणमंत्री म्हणाले.