जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला त्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराने कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तानवरील लष्करी दबाव कमी करणार नाही अशी रोखठोख भूमिका घेतली आहे. पाकिस्तानकडून होणारा गोळीबार लक्षात घेऊन सध्या सीमेवरील अनेक गावे रिकामी करण्यात आली आहेत. गावकऱ्यांच्या निवासाची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे. पाकिस्तान जो पर्यंत दहशतवादी कारवाया बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कुठलीही तडजोड करायची नाही असे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने हे वृत्त दिले आहे.

सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानबरोबर तडजोड किंवा डीजीएमओ स्तराच्या चर्चेमध्ये अजिबात रस नसल्याचे भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या वर्षात आतापर्यंत ४९० पेक्षा जास्त वेळा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. लष्कराने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे ठोस काही निष्पन्न होणार आहे का? असा प्रश्नही आता विचारला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लाँच पॅडसमध्ये ३०० ते ४०० दहशतवादी प्रतिक्षेत आहेत.

मागच्या काही महिन्यात भारतीय लष्कराने घुसखोरीचे अनेक प्रयत्न उधळून लावले आहेत. अनेक दहशतवादी भारतीय लष्कराच्या कारवाईत मारले गेले आहेत. सध्या भारतीय लष्कराची घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करण्याची रणनीती आहे. भारतीय लष्कराने याच रणनीतीतंर्गत घुसखोरांना मदत करणाऱ्या बालनोई, मेंढर, कालाल, केरान, डोडा, सारला आणि बानवत भागातील पाकिस्तानी चौक्या उद्धवस्त केल्या आहेत. सीमेवर सुरु असलेल्या या लढाईत पाकिस्तानचे २५ पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. भारताने आतापर्यंत आपले १६ जवान गमावले आहेत.