पाकिस्तानकडून सीमा भागात वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते, अशा शब्दांत भारताकडून पाकिस्तानचा तीव्र निषेध करण्यात आला. दोन्ही देशांच्या लष्करी महासंचालकांमध्ये दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये सध्या वाद सुरू असल्याने लष्करी पातळीवर ध्वज बैठक (फ्लॅग मीटिंग) घेण्याचा निर्णयही घेण्यात आला.
पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे निर्माण झालेली स्थिती आटोक्यात आणण्यासाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न केले जात असले तरी पाकिस्तानकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही, असे सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी. के. पाठक यांनी सांगितले.
शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि सीमेपलीकडून होणारा गोळीबार थांबविण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले, चार ते पाच वेळा बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला पकिस्तानने प्रतिसाद दिला नाही, असे पाठक म्हणाले. शस्त्रसंधीचे सातत्याने उल्लंघन झाले तेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचे १६ वेळा प्रयत्न केले, प्रथम त्यांनी प्रतिसाद दिला, मात्र त्यानंतर पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असेही ते म्हणाले. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून तब्बल ९५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.