सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानकडून विविध प्रकारे भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहे. मात्र भारतीय जवानांकडून पाकिस्तानचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भारतीय जवानांना एलओसीजवळ घिरट्या मारणारं पाकिस्तानी लष्कराचं एक क्वाडकॉप्टर पाडण्यात यश आलं आहे.

सीमारेषेवरील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी व दहशतवाद्यांना घुसखोरीस मदत व्हावी यासाठी हे क्वाडकॉप्टर आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घिरट्या मारत होतं, अशी माहिती मिळाली आहे.

क्वाडकॉप्टर हे एका ड्रोन सारखे असते. ज्याद्वारे हेरगिरी केली जाऊ शकते किंवा कमी वजानांची शस्त्रं पाठवता येतात. प्राप्त माहितीनुसार पाकिस्तानचे हे क्वाडकॉप्टर चिनी कंपनीद्वारे निर्माण केलेले होते. ते जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये जवळपास ७० मीटर आतमध्ये शिरले होते. भारतीय जवानांना ते आढळल्याने जवानांनी तातडीने ते पाडले.

काही दिवस अगोदरच पीर पांजाल रेंजमध्ये पाकिस्तानद्वारे ड्रोन पाठवून हेरगिरीचा प्रयत्न करण्यात आला होता. तर, जून मध्ये देखील बीएसएफच्या जवानांनी कठुआमध्ये आतंरराष्ट्रीय सीमेजळ अत्याधुनिक रायफल व ग्रेनेडसह असलेले एक पाकिस्तानी ड्रोन पाडले होते.