X

सर्जिकल स्ट्राइकदरम्यान लष्कराला झाली बिबट्याच्या विष्ठेची मदत

२०१६ मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला करत दहशतवाद्यांचा खात्मा केला होता

भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइकदरम्यान बिबट्याच्या मलमूत्र आणि विष्ठेचा वापर केल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिली आहे. २०१६ मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. ऑपरेशन दरम्यान कुत्र्यांनी अडथळा आणू नये यासाठी भारतीय लष्कराकडून बिबट्याच्या मलमूत्र आणि विष्ठेचा वापर केला गेला. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे राजेंद्र निंभोरकर यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार देण्यात आला. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजेंद्र निंभोरकर यांनी सर्जिकल स्ट्राइक करण्याआधी परिसराचा पूर्ण अभ्यास केला होता. ‘अभ्यास करत असताना त्या परिसरात अनेकदा बिबट्या कुत्र्यांवर हल्ला करत असल्याची माहिती मिळाली होती. बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी कुत्रे रात्रीच्या वेळी स्थानिक परिसरात आसरा घ्यायचे’, असं राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितलं.

‘सर्जिकल स्ट्राइकची रणनीती आखताना आम्हाला रस्त्यात असणाऱ्या गावांमधून जाताना कुत्रे भुंकण्याची आणि हल्ला करण्याची शक्यता वाटत होती. यासाठी आम्ही सोबत बिबट्याचं मलमूत्र आणि विष्ठा सोबत नेली होती. आम्ही गावाच्या बाहेर त्यांचा वापर केला. आमची ही रणनीती चांगलीच यशस्वी झाली’, असं राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितलं.पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘सर्जिकल स्ट्राइकची मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळण्यात आली. तत्कालीन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका आठवड्यात सर्व तयारी करण्यास सांगितलं होतं. मी सैनिकांसोबत चर्चा केली होती, मात्र त्यांना जागेची माहिती दिली नव्हती. सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या एक दिवस आधी त्यांना कळलं होतं’.

सर्जिकल स्ट्राइकसंबंधी सांगताना त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही दहशतवादी तळांची माहिती मिळवली होती. आम्ही त्यांच्या वेळेचा अभ्यास केला आणि हल्ल्यासाठी पहाटे ३.३० ची वेळ अगदी योग्य असल्याचं लक्षात आलं. त्याआधी आमचे सैनिक सुरक्षितस्थळी पोहोचले होते. अडथळे पार करत ते पोहोचले होते. त्यांनी तीन दहशतवादी तळ नष्ट केले तसंच २९ दहशतवाद्यांचा खात्मा केला’.

First Published on: September 12, 2018 2:21 pm