भारतीय सैन्यात महिलांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर संधी देणार असल्याचे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी सांगितले. त्यामुळे लिंगभेदाच्या अडथळ्यापासून दूर जात भारतीय महिला आता युद्धभूमीवरही दिसण्याची शक्यता आहे. जगभरातील फार कमी देशामध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने सैन्यदलात स्थान देण्यात येते. पुरुषांचे वर्चस्व असणारे हे क्षेत्र वेगाने बदलत असून सैन्याच्या पोलीस दलात महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बिपीन रावत म्हणाले, महिला युद्धभूमीवर यायला हव्यात, भारतीय सैन्यात लवकरच हा बदल होईल. आता सुरुवातीच्या टप्प्यात महिलांना लष्करी पोलीस म्हणून भरती करण्याचा विचार आहे. पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या क्षेत्रात महिलांना स्थान देणे हा मोठा बदल असेल असेही ते म्हणाले. सध्या सैन्यामध्ये वैद्यकीय, कायदा, शिक्षण आणि इंजिनिअरींग क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणात असतात. परंतु काही कारणांमुळे प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्यांची नियुक्ती केली जात नव्हती. मात्र आता त्यांना ही संधीही दिली जाणार आहे.

मी महिलांना जवान म्हणून भरती करण्यास तयार आहे, सरकारने यासाठी परवानगी द्यावी असेही रावत म्हणाले. याबाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे त्यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. महिलांनी सैन्यदलात दाखल होण्यासाठी आपल्यातील हिंमत आणि ताकद दाखविण्याची आवश्यकता असून त्यांनी हे आव्हान स्विकारणे गरजेचे आहे.

भारतीय सैन्याच्या हवाई दलात मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर तीन महिलांना फायटर पायलट म्हणून संधी देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने संमती दिल्याने ही संधी दिली गेली. अवनी चतुर्वेदी, भावना कांथ आणि मोहना सिंग या महिलांची कामगिरी पाहून त्यांना ही संधी देण्यात आली होती. याबरोबरच नौदलातही महिलांची युद्धबोटीवर नेमणूक करण्याचा विचार सुरु आहे. सध्या नौदलातर्फे महिलांना प्रत्यक्ष युद्ध सोडून विविध विभागांत संधी देण्यात येत आहेत.

जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, फिनलॅंड, फ्रान्स, नॉर्वे, स्विडन, इस्त्राईल या देशांमध्ये महिला सैन्यातील अनेक क्षेत्रात भूमिका बजावत आहेत. यामध्ये लष्करी तळा आणि कॅन्टॉनमेंटकडे लक्ष देणे, सैनिकांकडून होणाऱ्या नियमांच्या उल्लंघनाला प्रतिबंध करणे, युद्धाच्या आणि शांततेच्या परिस्थितीत सैन्याच्या व्यूहरचनेबाबत ठरविणे, युद्धकैद्यांकडे लक्ष देणे आणि स्थानिक पोलिसांना सहकार्य करणे ही कामे या महिला मदत करतात.