‘वॉनाक्राय’ या रॅन्समवेअरने जगभरात धुमाकूळ घातला असला तरी, भारतातील एटीएम वापरकर्त्यांना त्याचा धोका नसल्याचे एका बँकरने स्पष्ट केले आहे. आपण बिनधोकपणे एटीएमचा वापर आपल्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी आणि इतर व्यवहारांसाठी करू शकतो. याचं कारण म्हणजे आपल्याकडील एटीएमवर असा हल्ला जर झाला तर ते आपोआप लॉक होतं. ‘वॉनाक्राय’ हे रॅन्समवेअर ‘बिटकॉईन’ या ‘व्हर्च्युअल करन्सी’च्या रूपात पैसे मागतं. या रॅन्समवेअरचा हल्ला झालाच तर ते मशीन ही बिटकॉईन्स मागतं. पण हे शक्य नसल्याने हे मशीन हॅक करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

नबांकुर सेन या ‘बंधन बँके’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘सिफी’ला दिलेल्या माहितीनुसार, रॅन्समवेअरचा सायबर हल्ला ही काळजीची बाब आहेच; पण ‘वॉनाक्राय’ य़ा व्हायरसमुळे ग्राहकांपेक्षा बँकांनाच जास्त काळजी घेण्याची गरज आहे. ज्या बँकांमधील यंत्रणा अद्ययावत नाही, त्या बँकांना जास्त धोका आहे. याचं कारण म्हणजे ‘मायक्रोसॉफ्ट’ प्रणालीतील एका कमतरतेचा फायदा उठवत हे रॅन्समवेअर ग्राहकांची माहिती चोरतं. यामुळे सर्व बँकांनी त्यांची यंत्रणा अद्ययावत ठेवणं आवश्यक आहे. बंधन बँकने त्यांच्या ग्राहकांसाठी काय उपाययोजना केल्या आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले की “त्यांच्या बँकेने खबरदारी म्हणून अनेक उपाययोजना केल्या आहेत. बँका त्यांच्याकडे असलेल्या माहितीसाठी अनेक उपाययोजना करत आहेत.” तत्पूर्वी माझे पैसे सुरक्षित आहेत की नाहीत या सामान्य जनतेच्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी हो असंच मिळत आहे. भारतातील एटीएम सध्यातरी या रॅन्समवेअरला दाद देत नाहीच, असेच चित्र सर्वत्र दिसतंय.