माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या कार्यकाळात देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी खूप वाईट काळ अनुभवला असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे. प्रतिष्ठीत कोलंबिया विद्यापीठाच्या व्याख्यानामध्ये त्या बोलत होत्या. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना नवीन आयुष्य देणे ही आजच्याघडीला माझी पहिली जबाबदारी आहे असे सीतारमन यांनी सांगितले.

रघुराम राजन प्रचंड हुशार असून त्यांच्याबद्दल मला आदर आहे. भारतीय अर्थव्यवस्था पूर्ण तेजीत असताना रघुराम राजन यांची आरबीआयच्या गव्हर्नरपदी निवड झाली होती असे सीतारामन म्हणाल्या. भारताच्या आर्थिक धोरणांसंबंधी दीपक अँड नीरा राज सेंटरने कोलंबिया विद्यापीठात सीतारामन यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

अलीकडेच रघुराम राजन यांनी ब्राऊन विद्यापीठात बोलताना नरेंद्र मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात आर्थिक आघाडीवर समाधानकारक कामगिरी केली नाही. आर्थिक विकास साध्य करण्यासाठी सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव होता असे म्हटले होते.

रघुराम राजन यांच्या या मतांवर निर्मला सीतारामन यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, राजन यांच्या कार्यकाळात बँकांकडून झालेले कर्ज वाटप एक गंभीर विषय आहे.  राजन आरबीआयचे गव्हर्नर असताना नेत्यांच्या एका फोन कॉलवर कर्ज मंजूर व्हायचे. आजही सार्वजनिक क्षेत्रातील बँका या दलदलीतून बाहेर येण्यासाठी सरकारवर अवलंबून आहेत असे सीतारमन म्हणाल्या.

मनमोहन सिंग आणि रघुराम राजन यांच्या कार्यकाळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची जितकी वाईट अवस्था होती. तितकी कधीच नव्हती. त्यावेळी आपल्या सर्वांना याबद्दल काहीच माहित नव्हते असे सीतारमन म्हणाल्या. भारतात सध्या मंदीसदृश्य स्थिती आहे. औद्योगिक उत्पादनासह सर्वच आघाडयांवरुन निराशाजनत बातम्या येत आहेत. रघुराम राजन यांनी वारंवार मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली आहे. भारतात वाहन उद्योग क्षेत्राला सध्या सर्वाधिक आर्थिक फटका बसला आहे.

आणखी वाचा- धक्कादायक: संयुक्त राष्ट्रांवरच आलीय दिवाळखोरीत जाण्याची वेळ

सीतारमन यांचे पतीच म्हणतात, देशाची अर्थव्यवस्था ठीक नाही
दोन दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी देखील देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचे म्हटले होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने योग्य ती पावलं उचलायला हवीत. मात्र, या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारकडे कोणताही ठोस रणनीती दिसत नाही.