पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यानं बँकिंग क्षेत्राचं धाबं दणाणलं असून या घोटाळ्यापेक्षा अनेरपट जास्त किमतीची भांडवली बाजारातली घसरण बँकांच्या शेअर्सची झाली आहे. पीएनबीचा घोटाळा सध्या तरी 11,400 कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे. तर, या घोटाळ्यानंतर शेअर बाजारात बँकांच्या शेअर्सच्या विक्रीचा जो तडाखा बसला त्यात 67,800 कोटी रुपयांची हवा झाल्याचे आढळले आहे. हा घोटाळा समोर आल्यापासून गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजारातील बँकेक्स हा निर्देशांक 28732 वरून घसरून सोमवारी तीनच्या सुमारास 28113 पर्यंत आला आहे. तब्बल सुमारे 615 अंकांच्या या घसरणीनं भारतीय बँकांचं भांडवली मूल्य सुमारे 70 हजार कोटींनी उतरवलं आहे.

गेल्या आठवड्याच्या अखेरीस पंजाब नॅशनल बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली आणि सोमवारीही हा सिलसिला सुरू राहिला आहे. याखेरीज अन्य बँकांच्या शेअर्समध्येही विक्रीचा जोर बघायला मिळाला. निरव मोदी व त्याच्या कंपन्यांनी पीएनबीमधल्या काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे 11,400 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे व फरार झाल्याचे उघडकीस आले. पीएनबीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा घोटाळा झाल्याचे व सीबीआयला सहकार्य करण्याचे मान्य केले. आज सोमवारी सीबीआयनं पीएनबीची मुंबईतली ब्रॅडी रोडवरची ती शाखा सील केली आणि जवळपास 11 आजी माजी कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू ठेवली आहेय या सगळ्यामध्ये पीएनबीच्या शेअरला बाजारात चांगलाच फटका बसला आहे. तसेट इतर बँकांच्या शेअर्सचीही विक्री होताना दिसत आहे.

शनिवारी युको बँकेने सांगितले की पीएनबीच्या निरव मोदीशी संबंधित बनावट सामंजस्य पत्रांमध्ये युको बँकही 41.13 कोटी डॉलर्सच्या व्यवहारात अडकली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियानं सांगितलं की त्यांचाही 1,360 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांशी संबंध जोडला गेला आहे तर अलाहाबाद बँकेचेही 2000 कोटी रुपयांच्या व्यवहारात हात पोळलेले आहेत. यामुळे आता सरकारी बँकांच्या शेअर्सचं नक्की मूल्य काय असेल, नक्की किती रुपयांचा घोटाळा आहे, हा एकच घोटाळा आहे की आणखी घोटाळे आहेत असे अनेक प्रश्न उपस्थित झाले असून एकूणच सरकारी बँकांकडे संशयाच्या नजरेने बघितले जात आहे.

अशा घोटाळ्यांमध्ये सुरक्षेची तरतूद म्हणून जास्त रक्कम बाजुला ठेवली जाईल परिणामी बँकांचा नफा घसरेल आणि त्यामुळे शेअर्सचे मुल्यही कमी होईल असे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ 11,800 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा प्रश्न नसून एकंदर यंत्रणाच कशी बेभरवशी आहे हा चिंतेचा विषय असल्याचे एका तज्ज्ञाने म्हटले आहे. सरकारी बँकांची यंत्रणा अकार्यक्षम असून सीबीएस किंवा कोअर बँकिंगसारखी यंत्रणा बाजुला सारून काम केलं जातं हे धक्कादायक असल्याचं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हा घोटाळा समोर आल्यापासून पीएनबीचा शेअर 25 टक्क्यांनी घसरला आहे. स्टेट बँकेच्या भांडवली मूल्याची 17,780 कोटी रुपयांनी हानी झाली आहे. तर अॅक्सिस, यस, आयसीआयसीआय या कासगी बँकांच्या शेअर्सनीही घसरण अनुभवली आहे. ज्या कालावधीत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1.4 टक्क्यांनी घसरला त्याच कालावधीत बँकेक्स मात्र 10 टक्क्यांनी पडला आहे. या सगळ्यामुळे 11,400 कोटी रुपयांच्या घोटाळ्यानं शेअर बाजारातल्या सुमारे 70 हजार कोटींची हवा झाल्याचे मात्र निष्पन्न झाले आहे.