स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांकडून भारताला आणखी पन्नास जणांच्या खात्यांची माहिती

काळा पैसा बाहेर काढण्याच्या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या प्रयत्नात स्वीस  बँक अधिकाऱ्यांनी पन्नास भारतीय नागरिकांच्या स्वित्झर्लंडमधील खात्यांची माहिती भारताला देण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. दोन्ही देशातील नियामक व अंमलबजावणी संस्थांनी त्यासाठी सहकार्य केले आहे. बेकायदेशीररीत्या स्वीस बँकेत पैसे दडवणाऱ्या लोकांविरोधात आता फास आवळला जाणार आहे.

ज्या लोकांच्या खात्यांची माहिती भारत सरकारला दिली जाणार आहे त्यात कंपन्यांशी संबंधित उद्योगपतींचा समावेश आहे, त्यात काही नावे बनावट आहेत. आर्थिक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी वस्तू, कापड उद्योग, स्थावर मालमत्ता, दूरसंचार, पेंट, गृह सजावट, हिरे व दागिने या उद्योगातील व्यक्तींचा यात समावेश आहे.

स्वित्झर्लंड हे काळे पैसे ठेवणाऱ्यांसाठी नंदनवन आहे हा समज पुसण्याचा तेथील प्रशासनाचा प्रयत्न असून भारतात काळ्या पैशाच्या मुद्दय़ाला राजकीय संवेदनशीलता प्राप्त झालेली आहे.

मोदी सरकारने २०१४ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आल्यानंतर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोहीमच आखली होती. तेव्हापासून भारत व स्वित्झर्लंड यांच्यात सहकार्य सुरू आहे. त्यासाठी द्विपक्षीय करारही जास्त मजबूत करण्यात आले आहेत. स्विस  सरकारने संघराज्य गॅझेट सूचना जारी करून किमान पन्नास भारतीय नागरिकांना नोटीस दिल्या असून त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे माहिती देण्यापूर्वी अखेरची संधी देण्यात आली आहे. काही व्यक्तींकडे योग्य कागदपत्रे नसल्याने त्यांनी काही विनंती केली तरी ती विचारात घेतली जाण्याची शक्यता कमीच आहे. स्विस सरकारने गेल्या वर्षभरात किमान शंभर भारतीय नागरिकांच्या खात्यांची माहिती भारत सरकारला दिली आहे. संबंधित व्यक्तींना त्यांची माहिती भारत सरकारला देण्यापूर्वी तीस दिवसात अपिलाची संधी दिली जाते. काही प्रकरणात ही मुदत दहा दिवसांची आहे.

कुणाची नावे ..

स्विस सरकारने त्यांच्या राजपत्रात जी नावे दिली आहेत त्यात कृष्णा भगवान रामचंद, पोटलुरी राजामोहन राव, कल्पेश हर्षद किनारीवाला, कुलदीप सिंग धिंग्रा, भास्करन नलिनी, ललिताबेन चिमणभाई पटेल, संजय दालमिया, पंकज कुमार सारोगी, अनिल भारद्वाज, थराणी रेणू टिकमदास, महेश  टिकमदास थरानी, सावनी विजय कन्हैयालाल, भास्करन थरूर, कल्पेशभाई पटेल, महेंद्रभाई, अजोय कुमार, दिनेश कुमार, हिमतसिंगका, रतनसिंग चौधरी, कथोटिया राकेश कुमार यांचा समावेश आहे. काही ठिकाणी केवळ नावांची आद्याक्षरे असून त्यात एनएमए, एमएमए, पीएएस,आरएएस, एबीकेआय, एपीएस, एएसबीके, एमएलए, एडीएस, आरपीएन, एमसीएस, जेएनव्ही, जेडी, एडी, यूजी, वायए, डीएम, एसएलएस, यूएल, एसएस, आरएन, व्हीएल, युएल, ओपीएल, पीएम, पीकेके, बीएलएस, एसकेएन, जेकेजे यांचा समावेश आहे. यातील काहींच्या कंपन्या कोलकाता, गुजरात, बंगळुरू, दिल्ली, मुंबईत आहेत. गेल्या काही आठवडय़ात अनेक भारतीयांना नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. एचएसबीसी, पनामा यादीतील काहींचा यात समावेश आहे.