29 October 2020

News Flash

मॉरिशसमध्ये तेलगळती झालेल्या जहाजाच्या भारतीय कप्तानास अटक

या जहाजातून हिंदी महासागरातील बेटांच्या परिसरात १ हजार टन तेलाची गळती झाली होती.

संग्रहित छायाचित्र

 

मॉरिशसनजीकच्या सागरात ज्या जहाजातून तेलगळती झाली त्याच्या भारतीय कप्तानास मॉरिशसच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या जहाजातून हिंदी महासागरातील बेटांच्या परिसरात १ हजार टन तेलाची गळती झाली होती.

एमव्ही वाकाशियो या जपानी जहाजाचा कप्तान सुनील कुमार नंदेश्वर हा भारतीय असून त्याच्यावर सागरी मार्ग धोक्यात आणल्याचा आरोप ठेवून अटक करण्यात आली. त्याच्या जामिनावर पुढील आठवडय़ात सुनावणी होऊ शकते, असे पोलीस निरीक्षक सिवो कुथेन यांनी सांगितले. त्याच्यावर अनेकआरोप ठेवण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची कसून चौकशी केली जाणार असून हे जहाज प्रवाळ बेटांजवळ अडकून त्यातून तेल गळती झाली त्यामुळे जैवविविधतेची मोठी हानी झाली आहे.

वाकाशियो जहाज २५ जुलैला दुर्घटनाग्रस्त झाले. अनेक दिवस सागरी लाटा झेलल्यानंतर  त्यातून ६ ऑगस्टला तेलगळती सुरू झाली होती. या जहाजात चार हजार टन तेल होते. त्यातील एक हजार टन सागरात पसरले. महेबोर्ग भागात हे तेल सांडले आहे. जहाजातून तीन हजार टन तेल बाहेर काढण्यात आले असून पर्यावरण गटांनी मोठय़ा हानीचा इशारा दिला आहे. हे जहाज किनाऱ्यापासून १० मैल दूरवरून जाणे अपेक्षित असताना ते भरकटले.

नागाशिकी कंपनीचे हे जहाज असून त्याने मार्ग का सोडला याची चौकशी सुरू आहे. मॉरिशस सरकारने कंपनीकडून नुकसान भरपाई मागितली आहे. गळतीपूर्वीच त्यातील तेल बाहेर का काढून घेतले नाही असा प्रश्न केला जात असून पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांनी खराब हवामानामुळे वेगाने प्रतिसाद देता आला नाही असे म्हटले आहे. फ्रान्स, जपान व संयुक्त राष्ट्रांचे तज्ञ या ठिकाणी मदतकार्य करीत आहेत. मॉरिशस सरकारने सदर बेटाचा पूर्व भाग बंद केला असून जहाजाचा बुडालेला भाग पर्यावरणावर घातक परिणाम करीत आहे त्यामुळे हे जहाज आठ नाविक मैल बाहेर आणून २ हजार फूट खोलीवर त्याला जलसमाधी दिली जाण्याची शक्यता पर्यावरण सल्लागार सुनील  द्वारकासिंग यांनी दिली. पण या भागात व्हेल माशांचे प्रजनन क्षेत्र असून त्यांना धोका होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 12:25 am

Web Title: indian captain arrested for oil spill in mauritius abn 97
Next Stories
1 वित्त कंपनीच्या वसुली हस्तकांकडून प्रवाशांसह बसचे अपहरण
2 शिक्षेची सुनावणी लांबणीवर टाकण्यासाठी प्रशांत भूषण यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3 बीड, उस्मानाबाद जिल्ह्य़ात कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक
Just Now!
X