एकीकडे पाकिस्तानसोबत तणावाचे वातावरण असताना बुधवारी भारत आणि चीनच्या सैन्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार लडाखमध्ये घडला. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बराच वेळ हा प्रकार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 134 किलोमीटर लांबीच्या पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर हा प्रकार घडला.

भारतीय सैनिक गस्त घालत असताना त्यांचा सामना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांशी झाला. दरम्यान या क्षेत्रात भारतीय सैनिकांच्या गस्त घालण्याला चीनच्या सैनिकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. यानंतर दोन्ही देशांनी या क्षेत्रात सैनिकांची संख्या वाढवली होती.

दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांचे सैन्य ब्रिगेडीअर स्तरावरील अधिकाऱ्यांच्या चर्चेसाठी तयार झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलच्या (LAC) स्थितीवरून दोन्ही देशांमध्ये मतभिन्नता आहे. त्यामुळे अशा घटना घडत असतात, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली. बॉर्डर पर्सनल मिटिंग किंवा फ्लॅग मिटींगद्वारे अशा घटना सोडवल्या जातात, असंही त्यांनी नमूद केलं.

पॅगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यावर 15 ऑगस्ट 2017 रोजी दोन्ही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला होता. त्याच वर्षी सिक्कीम-भूटान-तिबेट सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये बरेच दिवस तणाव होता. 73 दिवस एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर सैनिकांनी माघार घेतली होती.