अमेरिकेच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात ताब्यात घेतलेल्या भारतीय व्यक्तीचा अटलांटातील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. इमिग्रेशनसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे नसल्याने ५८ वर्षांच्या अतुल कुमार बाबुभाई पटेल यांना ताब्यात घेण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अटलांटामध्ये ठेवण्यात आले होते. मात्र सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या पटेल यांचा अटलांटाच्या रुग्णालयात मृत्यू झाला.

इमिग्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याने अतुल कुमार बाबुभाई पटेल यांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. हृदयविकारामुळे पटेल यांचा मृत्यू झाल्याची माहिती सीमाशुल्क आणि इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. पटेल १० मे रोजी इक्वेडोरहून अटलांटा विमानतळावर उतरले होते.

अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी अतुल कुमार बाबुभाई पटेल यांना विमानतळावर रोखले आणि त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र ‘पटेल यांना इमिग्रेशनसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करता आली नाहीत,’ असे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे. कागदपत्रे सादर करता न आल्याने सीमाशुल्क आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पटेल यांना ताब्यात घेतले. यानंतर पटेल यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होऊ लागला.

मागील शनिवारी इमिग्रेशन अधिकाऱ्यांच्या ताब्यात असताना अतुल कुमार बाबुभाई पटेल यांची तपासणी करताना त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले. यासोबतच त्यांना श्वास घेण्यात अडचणी येत असल्याचेही आढळून आल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

अतुल कुमार बाबूभाई पटेल यांच्या मृत्यूची माहिती इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून भारताला देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात अमेरिकेच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.