X
X

Al Qaeda Terror: अमेरिकेत दहशतवादाप्रकरणी भारतीय तरुणाला २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

अवलाकीला कुरिअरमार्फत २२ हजार अमेरिकी डॉलर्स दिले

‘अल-कायदा’Al Qaeda Terrorism या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत केल्याप्रकरणी याहा फारुख मोहम्मद या तरुणाला २७ वर्षे आणि ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतर याहा फारुख मोहम्मदला मायदेशी पाठवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

याहा मोहम्मद हा इंजिनिअरिंगच्या शिक्षणानिमित्त अमेरिकेत गेला होता. २००२ – २००४ या कालावधीत अमेरिकेतील ओहियो विद्यापीठात त्याने शिक्षण घेतले. मात्र यानंतर तो दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आला. २००८ मध्ये त्याने अमेरिकेतील तरुणीशी लग्न केले आणि तो अमेरिकेतच स्थायिक झाला. ‘अल- कायदा’ या दहशतवादी संघटनेचा येमेनमधील नेता अन्वर अल अवलाकीसाठी याहा मोहम्मद काम करत होता.

जुलै २००९ मध्ये याहा मोहम्मद आणि त्याचे दोन साथीदार येमेनमध्ये गेले होते. तिथे ते अन्वर अल अवलाकीची भेट घेणार होते. अवलाकी त्यांना प्रत्यक्षात भेटू शकला नाही. शेवटी या दोघांनी अवलाकीला कुरिअरमार्फत २२ हजार अमेरिकी डॉलर्स दिले. या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाणार होता. या कृत्यासाठी मोहम्मदला अटकही करण्यात आली.

तुरुंगात असताना मोहम्मदने तुरुंगातील त्याच्या साथीदाराला न्यायाधीशाची हत्या करायची आहे असे सांगितले होते. याची माहिती मिळताच एफबीआयचा अंडर कव्हर एजंट मोहम्मदच्या संपर्कात आला. त्याने न्यायाधीशाची हत्या करण्याची तयारी दर्शवली होती. संबंधित न्यायाधीशांसमोर मोहम्मदविरोधात सुरु असलेल्या खटल्याची सुनावणी सुरु होती. न्यायाधीशांच्या हत्येसाठी त्याने १५ हजार डॉलर्स देण्याची तयारीही दर्शवली होती. यातील १ हजार डॉलर्स अॅडव्हान्समध्ये देण्यासाठी मोहम्मदने त्या एजंटला कुटुंबियांची भेट घ्यायला सांगितले होते. २०१५ मध्ये अमेरिकेतील न्यायालयाने याहा मोहम्मदच्या भावाला आणि दोन मित्रांना दहशतवादी कारवायांप्रकरणी दोषी ठरवले होते.

23
First Published on: November 7, 2017 1:14 pm
  • Tags: terrorism,
  • Just Now!
    X