खुनाच्या गुन्ह्य़ाखाली फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या एका गुन्हेगाराची फाशी जोहोरच्या सुलतानांच्या आदेशावरून लांबणीवर टाकण्यात आली आहे. चंद्रन पासकरन (वय ३६) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. जोहोरचे सुलतान इब्राहिम इस्माइल यांनी त्याच्या फाशीस स्थगिती देण्याचा आदेश जारी केला होता, असे ‘फ्री मलेशिया टुडे’ या नियतकालिकाने म्हटले आहे. चंद्रन याला २००८ मध्ये जोहोर बाहरू उच्च न्यायालयाने २००३ मध्ये के मुथुरामन याचा खून केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. गेले अकरा वर्षे तो तुरुंगात आहे. संघराज्य न्यायालयात त्याने शिक्षेविरोधात अपील केले होते पण २०१२ मध्ये त्याची आव्हान याचिका त्या न्यायालयानेही फेटाळली होती.