अफगाणिस्तानमधील युद्धभूमीवर संयुक्त राष्ट्रांच्या पथकामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या तसेच लैंगिक अत्याचारांच्या पीडितांसाठी झटणाऱ्या भारतीय महिला पोलीस शक्ती देवी यांना संयुक्त राष्ट्रांचा मानाचा महिला शांतिदूत पुरस्कार देण्यात आला.  शक्ती देवी या जम्मू-काश्मीर पोलीस दलामध्ये असून, सध्या अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेमध्ये कार्यरत आहेत.अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्रांच्या पोलीस दलामध्ये कार्य करताना उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना गौरविण्यात आल्याचे संयुक्त राष्ट्रांनी भारताला पाठविलेल्या माहितीपत्रकामध्ये म्हटले आहे.  अफगाणिस्तानमधील महिला पोलीस दलाला प्रबळ करण्यामध्ये शक्ती देवी यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महिला पोलिसांना सक्षम करण्यासाठी देवी यांनी मेहनत घेतली. हे कार्य करीत असतानाच लैंगिक अत्याचार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठीही त्या धडपड करीत होत्या.