जर्मनीत भारतीय दांपत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी जखमी झाली आहे. एका इमिग्रंटने हा हल्ला केला आहे. म्युनिच येथे हा हल्ला करण्यात आला. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. या घटनेबद्दल सुषमा स्वराज यांनी शोक व्यक्त केला असून कुटुंबीयांना जर्मनीला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं आहे.

सुषमा स्वराज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘भारतीय दांपत्य प्रशांत आणि स्मिता बसारुर यांच्यावर म्युनिच येथे इमिग्रंटने हल्ला केला आहे. दुर्दैवाने प्रशांत यांचा मृत्यू झाला आहे. स्मिता यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहेत. प्रशांत यांच्या भावाला जर्मनीला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या घटनेने मला दुख: झालं आहे’.

सुषमा स्वराज यांनी तेथील भारतीय मिशनला पीडितांच्या मुलांची काळजी घेण्याची सूचना केली आहे. सुषमा स्वराज यांनी सहकार्य केल्याबद्दल जर्मनीमधील अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. दांपत्याला दोन मुलं असून त्यांची काळजी घेण्यास सांगितलं असल्याची माहितीही त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.