भारतीय दांपत्याला कॅनडात वंशद्वेषी वागणूक देण्यात आल्याचं समोर आलं असून यावेळी त्यांना देश सोडून जाण्याची तसंच मुलांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. हॅमिल्टन येथील वॉलमार्ट सुपरसेंटरच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. दांपत्य कार पार्क करत असताना हा वाद सुरु झाला. डेल रॉबर्टसन या व्यक्तीने त्यांना थेट धमकावण्यास सुरुवात करत मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत डेल रॉबर्टसन ट्रकमध्ये बसून धमकावत असल्याचं दिसत आहे. तो दांपत्यासोबत उद्धट भाषेत बोलत असल्याचंही ऐकू येत आहे. अद्याप भारतीय दांपत्याची ओळख पटलेली नाही. भारतीय व्यकी धमकावणाऱ्या डेल रॉबर्टसनला तुम्ही तुमच्या मुलांसमोर काय उदाहरण ठेवत आहात ? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. यावेळी त्याची पत्नी हा सर्व प्रकार मोबाइलमध्ये शूट करत होती.

यावेळी भारतीय व्यक्ती ‘तुम्हाला मी माझ्या देशात जावं असं वाटतंय ना ? मी कॅनडाचाच नागरिक आहे’, असं सांगताना दिसतोय. यानंतरही डेल रॉबर्टसन आपलं उद्धट वागणं सुरु ठेवत, ‘माझा तुमच्यावर विश्वास नाही. पुरावा दाखवा. तुम्ही कॅनडावासियांप्रमाणे बोलत नाही. मी वंशद्वेषी आहे. मला तुम्ही आवडत नाही. तुमच्या मुलांना मी ठार करेन’, म्हणताना दिसत आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय दांपत्य गेल्या सात ते आठ वर्षांपासून कॅनडात वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून त्यांनी डेल रॉबर्टसनला अटक केली आहे.