टीम इंडियाचा क्रिकेटर जसप्रीत बुमराह याचे आजोबा संतोष सिंह बुमराह यांचा मृतदेह गुजरातच्या साबरमती नदीत सापडला आहे. ते ८४ वर्षांचे होते, उत्तराखंड येथून ते अहमदाबादला जसप्रीतला भेटण्यासाठी गेले होते. मात्र या दोघांची भेट होऊ शकली नाही. ते अहमदाबादहून निघून घरी पोहचले नाहीत या गोष्टीला काही दिवस गेले म्हणून पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीनुसार, अहमदाबाद फायर अँड इमर्जन्सी सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी साबरमती नदीतून संतोष सिंह यांचा मृतदेह बाहेर काढला.

जसप्रीत बुमराह आणि त्याचे आजोबा वेगळे राहात होते. मिळालेल्या माहितीनुसार संतोष सिंह जसप्रीतला भेटायला अहमदाबादला गेले होते पण तिथे त्यांची कोणासोबतच भेट झाली नाही. मागील शुक्रवारपासून माझे वडिल बेपत्ता झाल्याची माहिती संतोष सिंह यांची मुलगी राजिंदर कौरने पोलिसांना दिली. तसेच ते घरी न परतल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रारही आम्ही पोलिसात नोंदवल्याचेही कौर यांनी सांगितले. पोलीस या प्रकरणी तपास करत असतानाच त्यांना साबरमती नदीत एक मृतदेह आढळला. जो संतोष सिंह यांचाच असल्याची खात्री पटली आणि त्यानंतर बुमराहचे चे आजोबाच असल्याचीही माहिती समोर आली.

संतोष सिंह यांच्या अहमदाबादमध्ये तीन फॅक्टरी होत्या. २००१ मध्ये जसप्रीत बुमराहचे वडिल जसवीर बुमराह यांचा मृत्यू झाला. ज्यानंतर आर्थिक अडचणींमुळे संतोष सिंह यांना या तिन्ही फॅक्टरी विकाव्या लागल्या. परिस्थिती खूपच बिकट झाल्याने संतोष सिंह यांनी अहमदाबाद सोडून उत्तराखंडमध्ये जाणे पसंत केले. यानंतर काही कौटुंबिक वादांमुळे जसप्रीतची आई आणि जसप्रीत हे त्यांच्यापासून वेगळे राहू लागले. आता संतोष सिंह यांचा मृत्यू झाल्याचीच बातमी समोर आली आहे.