पाकिस्तानने लागोपाठ दुसऱ्या दिवशी भारतीय उप उच्चायुक्तांकडे आपला निषेध नोंदवला आहे. भारतीय सैन्याकडून वारंवार नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जात असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला. विशेष म्हणजे ‘पाकिस्तान सैन्याने कोणतीही आगळीक केली नसतानाही भारतीय सैन्य नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे’, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे.

भारताकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे, असा आरोप करत भारताचे राजदूत जे. पी. सिंह यांच्याकडे लागोपाठ दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने निषेध व्यक्त केला. ‘दक्षिण आशियाच्या महासंचालकांनी भारतीय उप उच्चायुक्तांकडे निषेध नोंदवला. पाकिस्तानकडून गोळीबार केला जात नसतानाही भारताकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला’, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

‘भारताने २५-२६ ऑक्टोबरला चापरार, हरपाल आणि भीमबेर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. यासाठी पाकिस्तानकडून भारताचा निषेध केला जातो आहे. या गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आणि नऊ जण जखमी झाले,’ असा उल्लेख पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.

‘भारताने शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांची चौकशी करावी आणि त्या चौकशीतून समोर येणारी माहिती पाकिस्तानला द्यावी’, असा सल्ला पाकिस्तानकडून देण्यात आला आहे. ‘भारताने आपल्या सैनिकांना शस्त्रसंधीचा सन्मान करण्याच्या, गावांना जाणूनबुजून लक्ष्य न करण्याच्या, सीमेवर शांतता ठेवण्याच्या सूचना द्याव्यात’, असे सल्लेही पाकिस्तानकडून देण्यात आले आहेत.

पाकिस्तानने राजौरीतील नौशेरा सेक्टरमध्ये छोटी शस्त्रे आणि तोफगोळ्यांसाह हल्ला केल्याचे भारताने मंगळवारी म्हटले होते. यावेळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. १८ सप्टेंबरला उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यावर भारतीय सैन्याने २९ सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राइक केले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या या कारवाईत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले होते. या सर्जिकल स्ट्राइकनंतर आतापर्यंत पाकिस्तानने ४० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.