सोमवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवायांच्या प्रमुखांनी (डीजीएमओ) बातचीत केली. यावेळी नियंत्रण रेषेजवळील ट्रेनिंग कॅम्प आणि पाकिस्तानी जवानांनी भारतीय जवानांच्या मृतदेहांची केलेली विटंबना यावर चर्चा झाली. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या हल्ल्याचा मुद्दा भारताकडून उपस्थित करण्यात आला. मात्र पाकिस्तानने भारताकडून याबद्दलचे पुरावे मागितले.

पाकिस्तानी सैन्याने हल्लेखोरांना संरक्षण दिल्याचे भारताच्या डीजीएमओंनी म्हटले. मात्र पाकिस्तानने भारताच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला असेल, तर त्याचे पुरावे द्या,’ असे पाकिस्तानने म्हटले आहे. काल (मंगळवारी) भारत आणि पाकिस्तानच्या लोकल कमांडर्समध्ये रात्री रावलाकोट-पुंछ सेक्टरमध्ये हॉटलाईनवरुन बातचीत झाली. मंगळवारी इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन्सकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला.

‘पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आलेले नाही. पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबनादेखील करण्यात आलेली नाही,’ असा पवित्रा पाकिस्तानच्या डीजीएमओंनी घेतला. भारताकडून आणि भारतातल्या प्रसारमाध्यमांकडून विनाकारण पाकिस्तानवर आरोप केले जात आहेत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे.

सोमवारी पाकिस्तानने केलेल्या गोळीबार आणि रॉकेट लाँचरच्या हल्ल्यात दोन भारतीय जवान हुतात्मा झाले होते. हुतात्मा झालेल्यांमध्ये एक जेसीओ आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश होता. हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. एक मे २०१७ रोजी कृष्णा सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ दोन चौक्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी रॉकेट लाँचरने हल्ला करत गोळीबारदेखील केला.

पाकिस्तानी सैनिकांनी भ्याड हल्ला करत आमच्या दोन जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली, असल्याचे लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या या नृशंस कृत्याचे चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे. त्यानंतर रात्री उशिरा भारतीय सैनिकांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या ७ सैनिकांना कंठस्नान घालून त्यांच्या दोन चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.