देशभरात सध्या सीसीए (सुधारित नागरिकत्व कायद्या) वरून वादंग सुरू आहे, शिवाय एनपीआरमुळे (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) एनआरसीचा (राष्ट्रीय नागरिक नोंदणी) मुद्दा देखील अधिकच चर्चेत आल्याचे दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये सीएए व एनआरसीची अंमलबजावणी करण्यास नकार दर्शवण्यात आला आहे, शिवाय काँग्रेससह विरोधकांकडून केंद्र सरकारावर या मुद्यांवरून जोरादार टीका केली जात आहे. मात्र, दुसरीकडे अमेरिकेत सीएए व एनआरसीच्या समर्थनार्थ तेथील भारतीयांकडून रॅलींचे आयोजन केले जात आहे. या कायद्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी अमेरिकेतील भारतीय रस्त्यांवर उतरून एकजुट दाखवत आहेत.

सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल असलेल्या अफवा व चुकीची माहिती दूर करणे हा तेथील भारतीयांचा रॅली काढण्या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून २०२१ च्या जनगणनेसाठी व नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टरसाठी १२ हजार ७०० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय गृहमंत्री अमित शाह यांनी हे देखील स्पष्ट केले आहे की, एनआरसी व एनपीआर यांचा काही संबंध नाही.

अमेरिकेतील भारतीयांनी सीएटल, ऑस्टीन व ह्युस्टन, डब्लिन इत्यादी ठिकाणी या कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढलेली आहे. तर, शिकागो, सॅन फ्रॅन्सिस्को, न्युयॉर्क सिटी, वॉशिंग्टन डीसी, अटलांटा, सॅनजोस व अन्य ठिकाणी देखील आगामी काही दिवसात रॅला काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आलेली आहे. तसेच, रॅली आयोजकाकडून हे देखील सांगण्यात आले की, आम्ही सीएए आणि एनआरसी बद्दल इस्लामिक व डाव्या विचार सरणीच्या संघटनामध्ये असलेला संभ्रम व भीती दूर करण्यासाठी या रॅली काढत आहोत.